Join us

तरुणांनी उद्योजक बनावे

By admin | Updated: February 4, 2015 22:56 IST

नोकरी करून परावलंबी जीवन जगण्यापेक्षा तरुणांनी उद्योजक होऊन स्वावलंबी बनावे. दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे शिक्षण, वय, भांडवल या गोष्टी दुय्यम ठरतात,’

नवी मुंबई : ‘नोकरी करून परावलंबी जीवन जगण्यापेक्षा तरुणांनी उद्योजक होऊन स्वावलंबी बनावे. दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे शिक्षण, वय, भांडवल या गोष्टी दुय्यम ठरतात,’ असे मार्गदर्शन ‘विको उद्योग समूहा’चे संचालक संजीव पेंढरकर यांनी केले. भारती विद्यापीठाचा ‘स्पंदन २०१५’ हा कार्यक्रम सीबीडी येथील प्रांगणात झाला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भारती विद्यापीठाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात झाले. बी. फार्म., बिझनेस मॅनेजमेंट आणि कायद्याचे पदवीधर असलेल्या पेंढरकर यांनी विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समोरचा सळसळत्या रक्ताचा तरुण वर्ग, विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि कुशल नेतृत्वाचे प्राचार्य डॉ. विलासराव कदम यांचे त्यांनी कौतुक केले. ‘विद्यापीठ हा जगन्नाथाचा रथ असून तो पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. प्राचार्य विलासराव कदम म्हणजे भारती विद्यापीठाचे ब्रेन अ‍ॅण्ड हार्ट आहेत,’ अशी प्रशंसा त्यांनी केली.‘आजच्या नैराश्याने ग्रासलेल्या, सर्व क्षमता अंगी असूनही त्याचे चीज होत नाही म्हणून अस्वस्थ असलेल्या तरुणाईने आत्मविश्वासाने पुढे यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘कल-आज-कल’ यामधले वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडले. एक उद्योजक म्हणून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचे ठरले. (वा.प्र.)