Join us

आचारसंहितेपूर्वी कामगारांना कायम करून दाखवा

By admin | Updated: August 14, 2014 01:01 IST

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंत्राटी कामगारांना कायम करण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. आचारसंहितेपूर्वी त्यांना कायम करून दाखवा असे

नवी मुंबई : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंत्राटी कामगारांना कायम करण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. आचारसंहितेपूर्वी त्यांना कायम करून दाखवा असे आव्हान शिवसेनेने दिले आहे. कामगारांची दिशाभूल करण्यात येत असल्याची टीकाही केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ९५०० कामगारांना याचा लाभ होईल असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने केला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक कामगार मंत्री असताना व स्थापनेपासून पालिकेत त्यांची सत्ता असताना कंत्राटी कामगारांना कायम केले नाही. कधीच कायम करणार नाही अशी भूमिका त्यांनी यापूर्वी घेतली होती. परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालिकेत ठराव मंजूर केला आहे. एनएमएमटीमध्ये यांनीच कंत्राटी पद्धतीने चालक व वाहक भरले. शिवसेनेने या कामगारांना कायम करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पालिकेतील डॉक्टर व इतर कर्मचारी कायम सेवेत असावे यासाठी न्यायालयात धाव घेतली असल्याचे सांगितले.पालकमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी कामगारांना कायम सेवेत घेतले तर राजकारण सोडून देईल, असे आव्हानही चौगुले यांनी दिले आहे. कामगारांची फसवणूक केली जात असून याविषयी आम्ही आयुक्त व शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेपूर्वी पालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशाराही दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, रंजना शिंत्रे, सुरेश म्हात्रे, विजय माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)