Join us  

सत्तांतर करण्यासाठी देशवासीयांनी, तरुणांनी पुढाकार घ्या -कन्हैयाकुमार  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 4:18 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे असून, २०१४ च्या ३१ टक्के जनतेची मते घेऊन आणि निवडणुकीत देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेला आता दिसला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे असून, २०१४ च्या ३१ टक्के जनतेची मते घेऊन आणि निवडणुकीत देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेला आता दिसला आहे. त्यामुळे आता देशाची धोक्यात आलेली लोकशाही व ढासाळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सत्तांतर होण्यासाठी देशवासीयांनी आणि विशेष करून तरुणांनी आता पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन कम्युनिस्ट नेते आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी शनिवारी वांद्रे येथे केले.वांद्रे पश्चिम येथील फादर अँग्नल सभागृहात आॅल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस (एआयपीसी) आयोजित ‘सत्यमेव जयते फ्रॉम बिहार टू तिहार’ या पुस्तकातील त्यांच्या अनुभवावर आणि सध्याच्या देशातील राजकीय परिस्थितीवर कन्हैयाकुमार यांच्याशी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.कन्हैयाकुमार म्हणाले, सत्तेवरून पायउतार झाल्यावर त्यांचे अनेक घोटाळे बाहेर येतील. मोदींच्या दावणीला पेड न्यूज चॅनल बांधली गेली असून मोदी आपले मुद्दे या माध्यमातून जनतेवर बिंबवत आहेत. त्यामुळे फेक न्यूजचा धोका त्यांनी ओळखला पाहिजे.जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मंदिर व मशीद मुद्दे उकरून काढणे, जातीयवादाला खतपाणी घालणे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दुय्यम स्थान देऊन त्यांची हत्या करणारे नथुराम गोडसे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयजयकार करण्याचे काम मोदी सरकार आणि त्यांची री ओढणारे त्यांचे अनुयायी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, पंधरा लाख रुपये आपल्या खात्यात टाकू, अशी मोदींची आश्वासने कुठे गेली, नोटा बंदी करून किती काळा पैसा बाहेर आला, असा सवाल त्यांनी केला. आज रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबई, दिल्ली व अन्य ठिकाणी येतात ही घोक्याची घंटा असून वाढते शहरीकरण रोखण्यासाठी ग्रामीण भागातच रोजगार व पूरक उद्योग निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.काश्मीर प्रश्न संवाद व चर्चेतून सुटू शकतो, असे सांगून आजच्या तरुणांनी व जनतेने सोशल मीडियावर आपला वेळ घालवण्यापेक्षा संवाद हा घरातून सुरू करावा, जनतेचे प्रश्न संवादातून सोडवा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :कन्हैय्या कुमारमुंबई