चेतन ननावरे, मुंबईआॅल इंडिया मजलीस ई इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे मुंबईतील एकमेव आमदार वारिस पठाण यांनी मुंबईतील इतर आमदारांच्या तुलनेने एका वर्षात सर्वाधिक कामे केल्याचा दावा केला आहे. पुढील चार वर्षांत मॉडर्न इंडिया आणि हरित मुंबईची संकल्पना राबवून भायखळ््याचे शांघाय करून दाखवण्याचा निर्धार त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.भायखळ््यातील धोकादायक इमारतींच्या डागडुजीचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पठाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, प्रत्येक इमारतीला डागडुजीसाठी कमाल ३ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्याची मर्यादा आहे. परिणामी रहिवाशांची मदत करण्यात अडथळे येत आहे. त्यामुळे सरकारने इमारतींच्या डागडुजीसाठी देण्यात येणाऱ्या कमाल निधीत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. संपूर्ण भायखळा विधानसभा परिसरातील अंधार दूर करण्यासाठी पाच हजार सौरदिवे लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सौरउर्जेवर चालणाऱ्या या दिव्यांमुळे विजेचीही बचत होणार असल्याचा दावा पठाण यांनी केला आहे. तर हरित मुंबईची संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी मतदारसंघात आवश्यक ठिकाणांची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार दोन हजार कचऱ्याचे डबे ठिकठिकाणी ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आग्रीपाडा पोलिसांना आवश्यक असलेल्या पोलीस बीट चौकी बसविल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय सीसीटीव्ही लावून पोलिसांना अधिक सक्षमतेने काम करण्यास मदत केली. पक्षाने एमडी ड्रग्जविरोधात जोरदार मोहिम सुरू करत भायखळ््यातून या अंमली पदार्थाला हद्दपार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. रूग्णसेवा हे प्राथमिक कार्य मानत जेजे, केईएम, भाभा, नायर अशा ठिकठिकाणी स्वयंसेवकांची टीम उभारल्याचेही त्यांनी सांगितले. बाहेरगावाहून आलेल्या आणि आपत्कालीन रुग्णांना आर्थिक, वैद्यकीय आणि रक्ताची गरज असल्यास मदत करण्याचे काम स्वयंसेवक करतात.याशिवाय पालिकास्तरीय कामेही आमदार निधीतून करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांमध्ये साखळी स्ट्रीट १, २, ३ आणि बदलपुरा येथील एकूण चार रस्त्यांचे काम सुरू केले आहे. तर विभागातील महत्त्वाच्या उद्यानांचे सुशोभिकरण करून बच्चेकंपनीला खेळण्यासाठी चांगले मैदान उपलब्ध करून दिले आहे. राणीबागचे मैदान पार्किंगसाठी देऊ नये, यासाठी विधानसभेत आवाज उठवल्याचेही त्यांनी सांगितले. तर नारळवाडी येथील कब्रस्तान, माझगावमधील स्मशानभूमीत डागडुजीची कामे केली. पालिका शाळांत संगणक देणे, डागडुजी करणे अशी अनेक कामे फक्त एका वर्षात करून दाखवल्याचे त्यांनी सांगितले.
भायखळ््याचे ‘शांघाय’ करणार, हरित मुंबईची संकल्पना राबविणार
By admin | Updated: November 14, 2015 02:40 IST