Join us

सुरक्षित व पारदर्शक जिल्हा बनविणार

By admin | Updated: August 27, 2014 00:11 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात जायला अनेक अधिकारी अनुत्सुक असले तरी या भागात रुजविलेल्या जवान, जनता व जंगले या त्रिसूत्रीला देशाने स्वीकारले आहे.

पालघर : गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात जायला अनेक अधिकारी अनुत्सुक असले तरी या भागात रुजविलेल्या जवान, जनता व जंगले या त्रिसूत्रीला देशाने स्वीकारले आहे. या यशस्वी त्रिसूत्रीमध्येच थोडासा बदल करुन मी पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लवकरच सुरुवात होणार असल्याचे पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मध्यप्रदेशच्या बालाघाट येथे जन्मलेले पोलीस अधीक्षक मोहम्मद हक हे २००७चे आयपीएस अधिकारी असून नाशिक ग्रामीणमधून त्यांनी पोलिसी खात्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. बीड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण येथे उपअधीक्षक तर पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे त्यांनी प्रथम नक्षलग्रस्त भागातील गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या भागात काम करताना स्वीकारली. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे यांच्या सिध्दांतावर मी चालत असून एका हातात गुलाबाचे फूल तर दुसऱ्या हातात पोलिसी दंडुका घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नक्षलग्रस्त भागात जवान, जनता यांच्याबरोबर काम करताना जंगलात मात्र नक्षलवाद्यांबरोबर दोन हातही केले. पालघर जिल्ह्यात नक्षलवादी नसले तरी गुन्हेगार व समाजकंटकांविरोधात कायद्याची लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाची सिस्टीम अवलंबिताना प्रथम वरिष्ठ नागरिक, समाजातील उपेक्षित घटक, महिला वर्ग, लहान मुले व गरीब अशा क्रमाक्रमाने प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाची घडी बसविताना प्रथम माझ्या घरापासून (अधीक्षक कार्यालय) सुरुवात करणार असून पारदर्शक कारभाराची हमी ही त्यांनी यावेळी दिली. यापुढे पहिले दोन महिने जिल्ह्यातील पोलीस ठाणी व व्यवस्थेचा अभ्यास करणार असून या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी प्रयास करणार आहे. पोलीस बांधवांवर १२ ते १८ तास कामे करताना त्यांच्यावर सतत टीका केली जाते, परंतु ते कुठल्या परिस्थितीत कामे करतात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असा सुरक्षित व पारदर्शक जिल्हा बनविण्याचे स्वप्न असल्याचे सांगून याकामी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे हक यांनी सांगितले. (वार्ताहर)