Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्हावेखाडीचा विकास आराखडा बनवा

By admin | Updated: May 2, 2015 05:00 IST

अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या न्हावेखाडी येथील तिन्ही पाड्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सिडकोने जवळपास दहा कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे

पनवेल : अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या न्हावेखाडी येथील तिन्ही पाड्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सिडकोने जवळपास दहा कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. गुरुवारी सिडको अधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी दौरा केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. न्हावेखाडी संघर्ष समीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळासह नुकतीच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची भेट घेतली होती. यावेळी भाटिया यांनी न्हावेखाडीच्या विकासकामांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सिडकोच्या दक्षता विभागाच्या प्रमुख, पोलीस महासंचालिका प्रज्ञा सरवदे, सिडकोचे मुख्य नियोजन अभियंता वरखेडकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. न्हावा ओएनजीसीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील पुलाची दयनीय अवस्था सिडको अधिकाऱ्यांनी पाहिली. तसेच येथील नाला बुजवल्याने मच्छीमारांच्या पोटावर कुऱ्हाड कोसळली आहे. समुद्राच्या पाण्यामुळे तिथे चिखलाचा गाळ साचला आहे, ही सगळी अवस्था सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरवदे यांनी तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. पुलाची तातडीने डागडुजी करण्याचेही आदेश देण्यात आले. पाण्याचा प्रश्न, रस्ते, खेळाच्या मैदानांचा प्रश्न अशा विविध प्रश्नांबाबत गावकऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांसमोर सूचना मांडल्या. गावातील मच्छीमारांसाठी ओटे, गणेश घाट, मोठा पाडा येथे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, बंधाऱ्याची डागडुजी करण्यात येईल, तीन मजली समाजमंदिर बांधण्यात येईल, असे आश्वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने कांतीलाल कडू, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच जागृत सुनील ठाकूर, उपसरपंच संजय ठाकूर, उत्तम म्हात्रे, टी.एम.म्हात्रे, गोपाळ कडू यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)