Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाले दोन्ही बाजूंनी १२ फूट मोकळे करा

By admin | Updated: October 3, 2015 23:50 IST

शहरातील नाल्यांवर जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती सर्व तोडून त्या नाल्यांच्या दोन्ही बाजू १२ फुटांपर्यंत मोकळ्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे : शहरातील नाल्यांवर जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती सर्व तोडून त्या नाल्यांच्या दोन्ही बाजू १२ फुटांपर्यंत मोकळ्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच भविष्यात त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही सूचना केल्या आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून तसेच आपत्कालीन काळात मदतकार्य करणे सुलभ व्हावे, यासाठी काही महिन्यांपूर्वीच महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यानंतर नाल्यांवरील आणि पदपथांवरील सर्व बांधकामे काढण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नाल्यांवरील आणि पदपथांवरील बांधकामे मोकळे करण्याचे आदेश दिले.कारवाईच्या पहिल्या टप्प्यामध्ये नाल्यांवरील सर्व बांधकामे निष्कासित करणे तसेच नाल्याच्या दोन्ही बाजू १२ फुटांपर्यंत मोकळ्या करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व पदपथ मोकळे करून ते दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.अतिक्र मणे निष्कासित करताना पदपथ आणि बिल्डिंग लाइनपर्यंत जी बांधकामे झाली आहेत, ती बांधकामे निष्कासित करण्याचे स्पष्ट करून त्या ठिकाणी भविष्यात कोणतीही बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)