मुंबई : वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देणारी बातमी आहे़ उपनगरांतील प्रमुख जंक्शनवर डिजिटल काउंटडाऊन टायमर बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ यामुळे वाहनचालकांना सिग्नलवरील प्रतीक्षेचा अचूक वेळ कळणार आहे़ जेणेकरून इंधनासह त्यांना आपल्या वेळेची बचत करता येणार आहे़ तर पादचाऱ्यांनाही बिनदिक्कत रस्ता ओलांडणे शक्य होणार आहे़मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने एरिया ट्रॅफिक कंट्रोल प्रकल्पांतर्गत २५३ नाक्यांवर अत्याधुनिक यंत्रणा बसविल्या आहेत़ त्यापाठोपाठ आता उपनगरांतही डिजिटल टायमर बसविण्यात येणार आहेत. दोन महिन्यांमध्ये या प्रकल्पावर काम सुरू होणे अपेक्षित आहे़ या प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे़ दोन वर्षांपूर्वी पालिकेने शहर भागात ८५ जंक्शनवर ६८५ डिजिटल टायमर बसविले होते़ जंक्शनला जोडणारे दोन ते चार मार्ग असल्याने उपनगरांत अधिक डिजिटल टायमर बसवावे लागणार आहेत़ आठ महिन्यांमध्ये हे यंत्र बसविणे अपेक्षित आहे़ या टायमरचा हमी कालावधी वर्षभराकरिता असेल़ त्यामुळे वर्षभरातच टायमर नादुरुस्त झाल्यास नवीन यंत्रे ठेकेदाराला विनामूल्य बसवावी लागतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)
मुख्य जंक्शनवर काउंटडाऊन टायमर
By admin | Updated: October 13, 2014 03:49 IST