Join us

मुख्य आरोपीस जामीन नाहीच

By admin | Updated: February 11, 2017 05:00 IST

गेल्या वर्षी पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनीअरवर झालेल्या बलात्कारप्रकरणी शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुख्य आरोपी अभिनय साही याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला

मुंबई : गेल्या वर्षी पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनीअरवर झालेल्या बलात्कारप्रकरणी शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुख्य आरोपी अभिनय साही याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला, तर सहआरोपी देवरथ दुबे आणि आनंद छानर यांची जामिनावर सुटका केली.गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे पुणे शहर हादरले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या अनेक मित्रांची धरपकड केली. अखेरीस त्यांनी अभिनय साही, देवरथ दुबे, आनंद छानर व अन्य काही जणांना ताब्यात घेतले. अभिनय साही व अन्य दोघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. मृदूला भाटकर यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी होती. साहीतर्फे अ‍ॅड. आबाद पौडा यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. ‘साही आणि तक्रारदार एकाच मोटरसायकलवरून आॅफिसच्या पार्टीसाठी जात होते. चहा पिण्यासाठी त्यांनी बाइक मध्येच थांबवली. ज्या चहाविक्रेत्याजवळ त्यांनी चहा घेतला, त्याने साही व तक्रारदारामध्ये भांडण झाल्याचे जबाबात कुठेही म्हटले नाही. गेल्याच वर्षी उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सहआरोपी अभिजित देबरॉय याचा जामीन अर्ज मंजूर केला.तक्रारीनुसार, भारतातील मोठ्या व प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारी तक्रारदार आणि अभिनय या दोघांनीही आॅफिसच्या पार्टीला जाण्याचे ठरवले. त्यानुसार २७ जानेवारी २०१६ रोजी ते एकाच मोटारसायकलवरून पार्टीला जाण्यासाठी निघाले. त्या वेळी तक्रारदाराने ड्रिंक व ड्राइव्ह करण्यास नकार दिला. त्यानंतर अभिनयने पीडितेला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे दोघेही कॉकटेल प्यायले. अभिनयने या कॉकटेलमध्ये अल्कोहोल मिसळले. रात्री सुमारे २ वाजता पीडितेला जाग आली. त्या वेळी ती धानोरीच्या एका फ्लॅटमध्ये होती. तिचे कपडे फाटले होते. तिने याबद्दल अभिनयकडे चौकशी केल्यावर त्याने यामध्ये तो एकटा सहभागी नसून फ्लॅटमध्ये असलेल्या अन्य मुलांकडेही चौकशी कर, असे तिला सांगितले.त्यानंतर त्या सर्वांनी पीडितेला तिच्या घरी सोडले. त्यानंतर तिने घडलेली घटना वडिलांना सांगितली आणि त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली. वैद्यकीय चाचणीवरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. मात्र काही दिवसांनी तिला सोडण्यात आले. (प्रतिनिधी)