Join us

माहीम किनाऱ्याचा लवकरच कायापालट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी माहीम किनारा सुशोभीकरणाची पाहणी केली. तसेच वृक्षारोपण अभियानाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी माहीम किनारा सुशोभीकरणाची पाहणी केली. तसेच वृक्षारोपण अभियानाची सुरुवात केली. याशिवाय दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) येथील सुशोभीकरणासोबतच टिळक पुलावरील वाहतूक व्यवस्थापन कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

माहीम किनाऱ्यावर नवीन सी-फेस तयार केला जात असून तब्बल २ हजार ४६० चौरस मीटरचा हा किनारा नव्याने विकसित केला जात आहे. सोमवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम येथे वृक्षारोपण अभियानाची सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत एक हजार मोठी तर दोन हजार छोटी झुडपे लावण्यात आली. ज्यामुळे पर्यटकांना हरित किनाऱ्याचा आनंद घेता येणार आहे. सोबतच ओपन जीम आणि वॉच टॉवरही साकारण्यात येणार आहे. तर, शिवाजी पार्कला खेळाचा, संस्कृतीचा, राजकारणाचा समृद्ध असा इतिहास आहे. या इतिहासाला कुठेही धक्का न लागू देता मैदानाचा विकास करण्याचा मानस ठाकरे यांनी व्यक्त केला. पार्कातील धुळीला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. भविष्याचा विचार रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या मार्गाने पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासण्यात यावी, मैदानाच्या बाजूला असलेल्या १०० वर्षे जुन्या पाणपोईची डागडुजी करून तो पुन्हा वापरात आणण्यासंदर्भात योग्य पावले उचलली जावीत, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या.

आदित्य ठाकरे यांनी दादर येथील टिळक ब्रीज व वीर कोतवाल उद्यान यांचीदेखील पाहणी केली. टिळक ब्रीज येथे होणाऱ्या ट्रॅफिकचे व्यवस्थापन करून ट्रॅफिक तत्काळ कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी करताना चर्चा केली. यावेळी नगरसेविका प्रीती पाटणकर, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.