Join us

महायुती, आघाडीत रस्सीखेच

By admin | Updated: August 14, 2014 00:39 IST

कल्याण जागावाटपात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत.

प्रशांत माने, कल्याणकल्याण जागावाटपात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. परंतु त्यांच्या मित्रपक्षांनी यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघावर दावा केल्याने महायुती आणि आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यात कोणताही बदल होणार नाही असा पवित्रा शिवसेनेने घेतला असताना राष्ट्रवादीचा हा प्रसिद्धीचा स्टंट आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. कल्याण विधानसभेच्या पुनर्रचनेत चार विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले. यात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. युती आणि आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. दरम्यान, या वेळी या मतदारसंघावर भाजपासह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाने दावा सांगितला आहे. तर राष्ट्रवादीनेही दावा केल्याने आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुनर्रचनेत चारपैकी तीन मतदारसंघ हे शिवसेनेच्या वाट्याला गेले आहेत परंतु यावेळी समान वाटप व्हावे यात कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळाला पाहिजे, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. तर कल्याण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणावर रिपाइंचा मतदार असल्याने ही जागा मिळाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. दुसरीकडे शिवसेनेने वर्चस्व असल्याचा दावा करीत बदल करण्यास सेनेने नापसंती दर्शवलीे. तर आघाडीतील राष्ट्रवादीने दावा केल्याने कल्याण पश्चिम हवा असल्यास मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर मतदारसंघ आम्हाला द्या, अशी मागणी स्थानिक काँग्रेसकडून होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आपल्यालाच हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी होत असली तरी याचा फैसला पक्षश्रेष्ठींच्या दरबारी होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे.