Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकार विरोधात ११ एप्रिल रोजी सायंकाळी महाविकास आघाडीचा भव्य मशाल मोर्चा

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 8, 2023 18:00 IST

महाराष्ट्रात दिवसेंदिवस ज्या सामाजिक अशांतता बिघडवणाऱ्या घटना घडत आहेत, जी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा बंदोबस्त करण्याकडे पण लक्ष द्या.

मुंबई-आज देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. देशभर एक अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहेत. देशात महिला सुरक्षित नाहीत. देशात सामाजिक अशांतता, दिवसेंदिवस बाहेर येणारे आर्थिक घोटाळे, वाढती महागाई आणि बेरोजगारी याने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. अशा प्रकारचे अराजक वातावरण आणि अघोषित आणीबाणीला कारणीभूत असलेल्या व देशाला हुकूमशाही पद्धतीने चालवू पाहणाऱ्या केंद्रातील भष्ट्राचारी भाजप सरकार व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विरोधात मंगळवार, ११ एप्रिल  रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

 हा मशाल मोर्चा माहीम कॉज वे, कॅडल रोड, हिंदुजा हॉस्पिटल, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर पश्चिम मुंबई या मार्गाने अहिंसेचे पालन करत काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. या मशाल मोर्चात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दल, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), सीपीआय, भारतीय कामगार सेना, जनता दल सेक्युलर तसंच काही सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. 

या पत्रकार परिषदेत भाई जगताप यांच्या समवेत, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष कॉम्रेड प्रकाश रेड्डी, समाजवादी पक्षाचे मिराज आझमी, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते. 

भाई जगताप पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाला गेले आहेत. याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही. प्रभू राम सर्वांच्या मनात आहेत. आमच्या सुद्धा मनात आहेत. पण आम्ही त्यांचे कधीही मार्केटिंग केले नाही. त्यांनी खुशाल प्रभू रामाच्या दर्शनाला जावे. पण त्या आधी महाराष्ट्रात जे रावण बोकाळले आहेत त्यांचे काय ? त्यांचा आधी बंदोबस्त करा.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस ज्या सामाजिक अशांतता बिघडवणाऱ्या घटना घडत आहेत, जी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा बंदोबस्त करण्याकडे पण लक्ष द्या. तसेच ज्या प्रकारे मुख्यमंत्री ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला पिकनिकला गेले होते. त्याच प्रमाणे ते अयोध्येला १० हजार लोकांचा लवाजमा घेऊन गेले आहेत. या १० हजार लोकांना लागणारा खर्च कोण करतोय  ? हा पैसा कुणाचा आहे, हा पैसा तुमचा आमचा सामान्य जनतेचा पैसाच आहे, त्याचा हिशोब कोण आणि कधी देणार, असा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल असल्याचे भाई जगताप म्हणाले.

 

टॅग्स :मुंबईराजकारणअशोक जगताप