Join us

महावीर मूर्ती चोरीचा जैन समाजाकडून निषेध

By admin | Updated: November 29, 2015 02:42 IST

बिहारच्या लच्छवाडातील भगवान महावीर यांच्या जन्मस्थळ क्षत्रियकुंड येथील २ हजार ६०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक मंदिरातील भगवान महावीरांची ५०० किलो वजनाची मूर्ती चोरीला

मुंबई : बिहारच्या लच्छवाडातील भगवान महावीर यांच्या जन्मस्थळ क्षत्रियकुंड येथील २ हजार ६०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक मंदिरातील भगवान महावीरांची ५०० किलो वजनाची मूर्ती चोरीला गेली. या घटनेचा निषेध महाराष्ट्रातील जैन बांधवांनी केला आहे. या मूर्तीचा शोध लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविद आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. हे कृत्य करणाऱ्याचा तत्काळ शोध घ्यावा. मूर्ती परत मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपाचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात ते सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. चोरीला गेलेली ही भगवान महावीरांची पहिली मूर्ती असल्याचे मानले जाते. भगवान महावीरांचे भाऊ भाई नंदीवर्धन यांनी महावीरांच्या काळातच या मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे जैन धर्मात महावीर यांची ही पहिली मूर्ती म्हणून मानली जाते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोढा यांनी चर्चा केली असून, बिहार सरकारशी बोलण्यास सांगितले आहे. बाबू अमीचंद देरासरचे वीरेंद्र शहा, जैनशक्ती फाउंडेशनचे कनक परमार, धर्मप्रेमी मुकेश बाबुलाल जैन, गिरीश शाह, वर्धमान परिवारचे अतुल वृजलाल शाह या जैन समाजातील नेत्यांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)