Join us  

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ  ठरला देशात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 3:49 PM

राजपथावर झालेल्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच तीनही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावित सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे

मुंबई - राजपथावर झालेल्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच तीनही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावित सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. छत्रपती शिवरायांची कीर्ती सांगणा-या चित्ररथाने प्रथम पुरस्कार मिळविला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील या यशस्वी कामगिरीबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिल्लीत फोन करून संबधित अधिकाऱ्यांचे आणि कला पथकाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सन्मान आहे असे तावडे यांनी सांगितले.

केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विजयी पथकाला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक संजय पाटील तसेच चित्ररथाची संकल्पना साकारणारे प्रा. नरेंद्र विचारे, कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते.

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राजपथावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा अवतरला होता. छत्रपती शिवरायांची कीर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर फिरला आणि महाराष्ट्राचे हे वैभव जगाला दिसले. महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक प्राप्त करून आपला दबदबा कायम राखला आहे. प्रा. नरेंद्र विचारे यांच्या संकल्पनेतून आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली महाराष्ट्राचा चित्ररथ साकारला आहे. यावेळी संचलनात राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23चित्ररथ सादर झाले होते. 

चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती, त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली होती. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती आणि मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले गेले होते.  त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे अध्यक्ष असलेल्या  दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर विभागाकडून सादर करण्यात आलेल्या बरेदी लोक नृत्य या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला आहे.  तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय रंग शाळेत झालेल्या आंतरराज्यीय नृत्य स्पर्धेत महाराष्ट्राचा पथकाने प्रथम क्रमांक मिळवित महाराष्ट्राचा मान राखला आहे.

टॅग्स :प्रजासत्ताक दिन २०१८