मुंबई : राज्याचे औद्योगिक विकास धोरण देशात अग्रेसर आहे. अन्य राज्याच्या तुलनेने आपण खूप पुढे आहोत. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील एमआयडीसींचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले होते, यावरून आपल्या धोरणाचे यश स्पष्ट होते, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व खनिजकर्म मंत्री तसेच एमआयडीसीचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ५५व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी एमआयडीसीतील कर्मचाºयांच्या समस्या अग्रक्रमाने सोडविल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.या वेळी उद्योग राज्यमंत्री आणि एमआयडीसीचे उपाध्यक्ष प्रवीण पोटे-पाटील, उद्योग खात्याचे मुख्य सचिव सुनील पोरवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, विक्रम कुमार, अजय गुल्हाने, एमआयडीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पेडणेकर, एमआयडीसी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी. बी. माळी आणि एमआयडीसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जी. एस. पोपट यांचीही उपस्थिती होती. या सोहळ्यात एमआयडीसी कर्मचाºयांच्या गुणवंत मुलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले, एमआयडीसी वसाहत ही आपल्या राज्यातच नव्हे, तर देशात नावलौकिक मिळवित आहे. या कार्यक्रमात एमआयडीसीतील तिन्ही प्रमुख संघटनेने कर्मचाºयांच्या मागण्या, समस्या, गरजा याकडे अधिकाºयांचे लक्ष वेधले.
औद्योगिक विकास धोरणात महाराष्ट्र अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:49 IST