मुंबई : अखिल भारतीय तिरंदाजी मुंबई महापौर स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडंूनी १२२ पदकांची कमाई करत, शानदार वर्चस्व राखले. तर जिल्हास्तरीय स्पर्धेत गोरेगावच्या प्रबोधन तिरंदाजी केंद्राने १५ सुवर्णांसह ३१ पदकांवर नाव कोरत, अव्वल स्थान पटकावले. पोयसर जिमखान्याने ११ सुवर्णांसह २१ पदके मिळवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.मुंबई महानगर पालिका आणि मुंबई तिरंदाजी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेत, १०, १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटासह वरिष्ठ आणि वयस्कर अशा एकूण सहा गटांमध्ये स्पर्धा खेळवण्यात आली. अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि जम्मू कश्मीर या राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या बहुतांशी गटांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विजयी घोडदौड केली. महाराष्ट्र संघाने ५० सुवर्ण पदकांसह ३५ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण १२२ पदके पटकावली. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रबोधनच्या तिरंदाजांनी १५ सुवर्णांसह ३१ पदकांची कमाई करत, अव्वल स्थान पटकावले. तर प्रशिक्षक मिलिंद पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पोयसरच्या तिरंदाजपटूंनी २१ पदकांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. यात ध्रुव देसाईने ४ सुवर्ण, याघवी सत्याने ४ सुवर्ण पदकांची कमाई केली. (क्रीडा प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व
By admin | Updated: April 25, 2017 01:49 IST