Join us  

Vidhan Sabha 2019 : फडणवीसांचे नेतृत्व पक्के; ‘युती’ मात्र टांगणीला!

By किरण अग्रवाल | Published: September 21, 2019 4:52 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केल्याने भविष्यातील सत्तेचे सोपान त्यांच्याच हाती सोपविले जाण्यावर तर शिक्कामोर्तब होऊन गेले आहेच;

-किरण अग्रवालविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेचा नाशकात समारोप करून ‘विजय संकल्प’ सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केल्याने भविष्यातील सत्तेचे सोपान त्यांच्याच हाती सोपविले जाण्यावर तर शिक्कामोर्तब होऊन गेले आहेच; शिवाय राममंदिराच्या मुद्द्यावरून सहयोगी शिवसेनेच्या नेतृत्वाला चपराक लगावली गेल्याने ‘युती’चे भवितव्य टांगणीला लागून जाणेही स्वाभाविक ठरले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधानांच्या मुख्य उपस्थितीत नाशकात झाला. यावेळी बोलताना मोदी यांनी, फडणवीस हे ऊर्जावान व कार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचे प्रमाणपत्र तर दिलेच; त्याबरोबर देवेंद्रजींसारख्या यात्रीस नमन करीत असल्याचे भावोद्गारही काढले. राजकीय अस्थिरता असतानाही स्थिर, प्रगतिशील, विकासशील व समर्पित सरकार देऊन फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे, आता पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याची जबाबदारी जनतेची असल्याचे सांगतानाच मोदी यांनी, फडणवीस हे जनतेच्या अपेक्षांनुरूप कामे करीत असल्याचे दाखले देत ‘जो आशा के अनुरूप काम करेगा, उसे ही जनता का आशीर्वाद मिलेगा’, असे ठासून सांगितल्याने उद्याचेही राज्यातील नेतृत्व फडणवीसांकडेच राहील याचे संकेत मिळून गेले आहेत.अर्थात, एकीकडे मोदींकडून फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे सहयोगी शिवसेना नेतृत्वाला राममंदिराच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्ष टोला लगावला गेल्याने युतीच्या भवितव्याबद्दलची शंका उपस्थित होणे रास्त ठरून गेले आहे. अगोदरच मुंबईतील ‘आरे’च्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून ‘कारे’ केले गेल्याने मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा कोकणात असताना शिवसेनेचे दुखणे ठरलेल्या नाणार प्रकल्पाच्या पुनर्विचाराचा मुद्दा मांडला. त्यामुळे उभय पक्षातील संबंध तणावाच्या स्थितीत आलेले दिसत आहेत. अगदी काही दिवसांपर्यंत परस्परातील सौख्याचे प्रदर्शन करीत एकमेकांबद्दल ‘ब्र’ निघणार नाही याची काळजी घेणारे उभय पक्षांचे नेते आता संधीच्या शोधात असल्यासारखे बोलताना दिसत आहेत. युतीच्या जागावाटपाचा आकडा शिवसेनेच्या अपेक्षेनुरूप ‘फिप्टी-फिप्टी’, की भाजपनुसार १५०-१२० असा; हा प्रश्न त्यातूनच जटिल होऊ पहात आहे. अशात, पंतप्रधान मोदी यांनी नाशकात बोलताना शिवसेनेचे किंवा या पक्षाच्या नेतृत्वाचे नाव न घेता टीका केल्याने ‘युती’ टिकून राहण्याबद्दलच्या संशयात भरच पडून गेली आहे.स्वतंत्र लढले तरी बहुमताचा आकडा गाठू शकतो, असे भाजपचे सर्वेक्षण सांगत असल्याने तसाही या पक्षातील एक गट स्वबळाच्या विचारांचा आहे. त्यात दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वही त्याच विचारांचे असल्याचे खुद्द पक्षातील काही नेतेच सांगतात. अशात, राममंदिराची पहिली वीट रचण्यास शिवसैनिक तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगून भाजपचा हा मुद्दा ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून आले. त्यामुळे असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ठ असताना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याऐवजी काही ‘बयानबहादूर’ व ‘बडबोले’ लोक, म्हणजे वाचाळवीर उगा भलतीच वक्तव्ये करीत असल्याचा टोला मोदी यांनी लगावला. तो अर्थातच थेट उद्धव ठाकरे यांनाच उद्देशून होता हे चटकन साऱ्यांच्याच लक्षात आले. परिणामी ‘युती’तील दोघा प्रमुख पक्षांमधील दरी दुरावत चालल्याचे संकेत त्यातून प्रसृत होणे स्वाभाविक ठरले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019