Join us

चॉकबॉल स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

By admin | Updated: November 11, 2016 00:16 IST

सिंधुदुर्गचे सुपुत्र संजय पेंडूरकर यांचे व्यवस्थापन : १९ वर्षांखालील गटात मुलींच्या संघाला सुवर्णपदक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा चॉकबॉल असोसिएशनचे सचिव तथा वराडकर हायस्कूलचे शिक्षक संजय पेंडूरकर यांच्या संघ व्यवस्थापनेखाली १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या मुलींच्या चॉकबॉल संघाने सुवर्णपदक, तर मुलांच्या संघाने रजतपदक मिळविले. गोवा येथे स्कूल गेम फेडरेशन आॅफ इंडिया व क्रीडा युवक सेवा संचलनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी शालेय राष्ट्रीय १९ वर्षांखालील चॉकबॉल अजिंक्यपद स्पर्धा पार पडली.महाराष्ट्राच्या या दोन्ही संघांचे पूर्व प्रशिक्षण सिंधुदुर्ग मालवण कट्टा येथील वराडकर हायस्कूलमध्ये घेण्यात आले होते. यावेळी संजय पेंडूरकर यांची दोन्ही संघांच्या व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात वराडकर हायस्कूलची विद्यार्थिनी प्रीती बांदल सहभागी होती. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून पंकज आगलावे (बुलढाणा), तर मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून सुशांत सूर्यवंशी (सांगली) यांनी काम पाहिले. यशस्वी संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर, महाराष्ट्र चॉकबॉल संघटना सचिव सुरेश गांधी, सिंधुदुर्ग जिल्हा चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राघोबा मिठबांवकर, उपाध्यक्ष संजय नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रूपेश परुळेकर यांनी अभिनंदन केले आहे.मुलांच्या संघाने साखळी सामन्यात सीबीएसई व आसाम यांच्यात होऊन महाराष्ट्राने उपउपांत्य सामन्यात प्रवेश केला. हा सामना उत्तराखंड यांच्यात होऊन ३६-१२ असा महाराष्ट्राने विजय मिळविला. उपांत्य सामन्यात गोव्याला १० गुणांनी नमविले. अंतिम सामन्यातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र व पंजाब यांचे समान गुण झाले. त्यामुळे पुन्हा बारा मिनिटांचा सामना खेळविण्यात आला. यावेळी पंजाबने महाराष्ट्रावर तीन गुणांनी निसटता विजय मिळविला. मुलींच्या संघाने पंजाबला नमविलेयावेळी पार पडलेल्या चॉकबॉल स्पर्धेतील मुलींच्या गटात महाराष्ट्राची लढत आसाम संघाशी झाली. या लढतीत ४६-०७ ने महाराष्ट्र विजयी झाला. त्यानंतर दिल्लीला ४७-१३ असे पराभूत केले. उपउपांत्य सामन्यात उत्तर प्रदेश संघाशी दोन हात करीत महाराष्ट्राने ५०-५ असा विजय मिळवीत सुवर्णपदक जिंकले. उपांत्य सामन्यात आंध्र प्रदेशला ६१-१२ अशा फरकाने पराभूत केले. अंतिम सामन्यात पंजाबला ५०-२४ अशा फरकाने नमवीत महाराष्ट्र मुलींच्या संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.