Join us  

‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; नवाब मलिक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 2:07 AM

हा अहवाल तयार करीत असताना नावीन्यपूर्ण योजना सुधारण्यासाठी त्यांची बलस्थाने व कमकुवत बाबींचा अभ्यास केला जातो. इनोव्हेशन कॅपबिलिटीज व इनोव्हेशन आऊटकम्स यांच्या आधारावर ही क्रमवारी तयार केली जाते.

मुंबई : कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर प्रथम क्रमांकावर तामिळनाडू असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नीती आयोगाने २० जानेवारी रोजी ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’चा निकाल जाहीर केला. यात तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले आहे. राज्याने २०१९च्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावरून २०२०मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची तुलनात्मक कामगिरी पाहून रँकिंग देण्यात येते. हा अहवाल तयार करीत असताना नावीन्यपूर्ण योजना सुधारण्यासाठी त्यांची बलस्थाने व कमकुवत बाबींचा अभ्यास केला जातो. इनोव्हेशन कॅपबिलिटीज व इनोव्हेशन आऊटकम्स यांच्या आधारावर ही क्रमवारी तयार केली जाते.

राज्यातील अनेक शासकीय विभागांच्या तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई फिनटेक हब इत्यादींच्या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य हे इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरे आले आहे. राज्य सरकारने हे निश्चित केले आहे की, महाराष्ट्र राज्य यात अग्रेसर असेल. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसीच्या माध्यमातून शासन स्टार्टअप व इनोव्हेशनला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यभर इन्क्युबेटरचे जाळेमहाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप विकचे आयोजन, राज्यभर इन्क्युबेटरचे जाळे तयार करणे, स्टार्टअप यात्रासारख्या उपक्रमाचे आयोजन, स्टार्टअपसाठी भरीव आर्थिक तरतूद इत्यादी उपक्रमांच्या साहाय्याने राज्याला एक महत्त्वपूर्ण इनोव्हेशन परिसंस्था बनविले जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

टॅग्स :नवाब मलिक