Join us  

महाराष्ट्र पोलिसांतर्फे मुंबईत ९ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:48 AM

पोलीस आणि जनतेमध्ये जवळीक वाढावी, त्यांच्यामध्ये संवाद वाढावा, या दृष्टीने या मॅरेथॉनचे आयोजन केले असून, आॅनलाइन नोंदणी करून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातर्फे येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहे. गेटवे आॅफ इंडिया ते वांद्रे सी लिंक मार्गापर्यंत होणाऱ्या मॅरेथॉनचे पहिल्यांदाच देशात पोलिसांमार्फत आयोजन होत आहे. त्याच्या वेबसाइटचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

पोलीस आणि जनतेमध्ये जवळीक वाढावी, त्यांच्यामध्ये संवाद वाढावा, या दृष्टीने या मॅरेथॉनचे आयोजन केले असून, आॅनलाइन नोंदणी करून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गेट वे आॅफ इंडिया ते वांद्रे सी लिंक अशी ही मॅरेथॉन असेल. स्वास्थ्यदायी दौड अशी या मॅरेथॉनची संकल्पना आहे. ही मॅरेथॉन ४२ किलोमीटर, २१ किलोमीटर, १० मैल व ५ किलोमीटर या प्रकारांमध्ये होणार आहे. धावपटूंना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये भारतभरातून, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुमारे १५ हजार धावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. मॅरेथॉनमध्ये ५ हजार पोलीस सहभागी होणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक ( प्रशासन) कृष्ण प्रकाश यांनी दिली.

मॅरेथॉनसंदर्भात जनजागृती करण्यासाठी २ फेब्रुवारीला १८ वर्षांवरील ३०० सायकलपटूंच्या सहभागाने पनवेल, कल्याण, मीरा-भार्इंदर येथून कुलाबा येथील पोलीस मुख्यालयापर्यंत सायकलफेरी काढण्यात येणार आहे, तसेच ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता महिलांची शक्ती आणि सुरक्षितता याचा संदेश देत, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये महिला दौडचेही आयोजन करण्यात येणार आहे.स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस, सक्षम पोलीस, सुदृढ पोलीस या दृष्टीने मॅरेथोनचे आयोजन करण्यात आले असून, यातून जनतेला निरोगी आरोग्यासाठी मॅरेथॉनचे महत्त्व पटवून देता येणार आहे, असे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी म्हणाले.मॅरेथॉनपूर्वी तंदुरुस्तीचे व्यायाम, सराव वा क्रीडाप्रकार करताना कुणालाही इजा, दुखापत होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातील २ हजार फिजिओथेरपिस्ट, तसेच ३०० होमिओपॅथीस्ट, आहारतज्ज्ञ यांची सेवा मॅरेथॉनमधील सहभागींना उपलब्ध करून दिली आहे. पोलीस मुख्यालयात मॅरेथॉनसंदर्भातील जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़ त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर पोलीस महासंचालक प्रशासक संजीव सिंघल, अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, अलाइड डिजिटलच्या संचालिका शुभदा जहागिरदार आदी उपस्थित होते.पोलीस आणि जनतेमध्ये संवाद वाढावा, तरुणांच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग व्हावा, राष्ट्रनिर्माणात तरुणांना अधिकाधिक सहभागी करून घेता यावे व त्याद्वारे समाजात एकता, सौहार्द वाढावे, हे या मॅरेथॉनमागचे उद्दिष्ट आहे, असे कृष्णप्रकाश म्हणाले.

टॅग्स :पोलिस