Join us  

सरकारवर अडचणीचा डोंगर, पण...; शपथ घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 10:51 PM

'नवीन सरकार अतिशय चांगलं काम करेल'

मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा किताब उद्धव ठाकरेंच्या नावे झाला आहे. दरम्यान, आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी टीव्ही नाइन मराठीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या सरकारवर अडचणींचा डोंगरच आहे. पण आम्ही त्याच्यातून मार्ग काढू. शेतकऱ्यांना ताबडतोड कर्जमाफी देणं शक्य नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायची, यावर बैठकीत चर्चा करणार आहोत, असंही छगन भुजबळ म्हणाले. मागच्या काळात मी अनेक संकटं पाहिली, त्याबद्दल मी आता सांगू इच्छित नाही. माझ्यावरचा कलंक पुसण्याचं काम पवारासाहेबांनी केलेलं आहे, मी त्यांचा फार आभारी आहे, असं म्हणत भुजबळ भावुक झाले. हे नवीन सरकार अतिशय चांगलं काम करेल, अतिशय समजूतदारपणे महाराष्ट्राची आणि जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.  जुने शिवसैनिक असल्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायला आवडेल, असंही ते म्हणाले आहेत. 

छगन भुजबळ यांच्या रूपाने पाच वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार देखील त्यांनाच दिला जाण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये भुजबळ यांनी प्रथम नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्यानंतर येवला मतदार संघातून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीत ते निवडून आले असले तरी युतीचे सरकार असल्यामुळे मंत्रीपदापासून ते दूर होते. आता पुन्हा ते मंत्रीमंडळात परतून आल्याने यंदा देखील त्यांना महत्वाच्या खात्यासह नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

यापुढील मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्यातून आणखी एक मंत्रीपद दादा भुसे यांना मिळण्याची शक्यता आहे. भुसे हे गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत राज्यमंत्री होते. आता शिवसेनेची सत्ता आल्याने पुन्हा त्यांना संधी मिळणे शक्य आहे. ते चौथ्यांदा निवडून गेले आहेत.

टॅग्स :छगन भुजबळ