मुंबई : मागील एक ते दीड वर्ष आपण कोरोनाचा सामना करीत असतानाही माझी वसुंधरा अभियान, कांदळवनांचे संरक्षण, जंगलांची वाढ यासाठी काम करीत आहोत. महाराष्ट्र हा पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत जगाला मार्ग दाखवू शकतो. यामध्ये सोशल मीडिया हे महत्त्वाचे टूल राहणार आहे. समाजमाध्यमे ही वर्तमानातील आरसा असून, आपल्या कामाचे प्रतिबिंब त्यात दिसून येत असते. म्हणून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकसंवाद साधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते, तर राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, जगभरात कोणतीही घडलेली घटना क्षणभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचते. म्हणून डिजिटल मीडिया खूप महत्त्वाचे माध्यम झाले आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ सोशल मीडियावर आल्याने पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणविषयक माहिती आणि जनजागृतीसाठी त्याचा व्यापक उपयोग होईल.