Join us  

राज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 9:58 PM

फडणवीस मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार असून, मंत्रिपदासाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत.

मुंबईः फडणवीस मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार असून, मंत्रिपदासाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत. भाजपाकडून  राधाकृष्ण विखे पाटील आणि आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असून, डॉ. संजय कुटे, अनिल बोंडे, परिणय फुके, अशोक उईके, सुरेश खाडे, बाळा भेगडे, अतुल सावे यांच्याही गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत या दोघांना विस्तारात सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या विस्तारात प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. 

विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात आठवलेंच्या रिपाइंलाही एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंचे खास मित्र आणि जुने विश्वासू सहकारी अविनाश महातेकर उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील, असं आठवलेंनीच सांगितलं आहे. ते म्हणाले, कॅबिनेट मंत्रिपदासाठी अविनाश महातेकरांचं नाव पुढे पाठवलं आहे. अविनाश महातेकर हे रिपाइं आठवले गटाचे सरचिटणीस आहेत. त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द रामदास आठवले यांनीच दिली आहे. भाजपानं दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानलेत.शिवसेनेकडून तानाजी सावंत की अनिल परब?मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली. शिवसेना दोन मंत्रिपदांबाबत आग्रही आहे. त्यापैकी एक, राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना दिलं जाऊ शकतं, तर दुसरीकडे तानाजी सावंत किंवा अनिल परब या दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांचं गाव माढा तालुक्यात आहे. त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून शिवसेना राष्ट्रवादीला शह देऊ इच्छिते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीस