Join us  

महापरिनिर्वाण दिन : ‘ऑनलाइन’ अभिवादनाच्या आवाहनाला कौतुकास्पद प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 6:18 AM

Mahaparinirvana Day: दरवर्षी ५ डिसेंबरपासूनच अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी गर्दी हाेते. यंदा तेवढी गर्दी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य ६ डिसेंबरलाही अपेक्षित आहे, असे आवाहन पालिकेने केले.

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. यंदा कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन पालिकेने केले. त्याला अनुयायांनी कौतुकास्पद प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळाले. दरवर्षी ५ डिसेंबरपासूनच अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी गर्दी हाेते. यंदा तेवढी गर्दी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य ६ डिसेंबरलाही अपेक्षित आहे, असे आवाहन पालिकेने केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिका पालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशन सदराखाली ई-पुस्तके विभागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती पुस्तिका २०२० या नावाने उपलब्ध आहे.प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येताही अनुयायांना अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण पालिकेकडून करण्यात येईल. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्‍या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असणारे चैत्यभूमी हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे आम्ही या व्यासपीठावर विराजमान आहोत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी येतात.  त्यांच्या साेयीसाठी पालिका सज्ज असते. कोरोना संसर्ग रोखण्यास राज्य सरकार, आपण सर्व  मिळून प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

थेट प्रक्षेपण पाहता येणारचैत्यभूमीवरील थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. महापरिनिर्वाणदिनी सोशल मीडियावरून ऑनलाइन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे लिंक उपलब्ध आहेत.यूट्युब : bit.ly/abhivadan2020yt येथे क्लिक करावे लागेल.फेसबुक: bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरमुंबई