Join us  

यूपीएससी परीक्षेत ‘महामुंबई’ चमकली; वृषाली कांबळे, स्नेहल वाघमारेने मारली बाजी  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 9:09 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/नवी मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात महामुंबईचे तरुण चमकले. नवी मुंबईतून वृषाली सीताराम कांबळे आणि डॉ. स्नेहल वाघमारे या दोघांनी बाजी मारली आहे. वृषाली कांबळे ही नेरूळ, तर डॉ. स्नेहल वाघमारे हे ऐरोली येथील रहिवासी आहेत. या परीक्षेत वृषाली हिने देशात ३१०वा, तर स्नेहल यांनी ९४५ वा क्रमांक पटकावला आहे. ठाणे शहरातील अनिकेत हिरडे यांनी ८१ वा तर समीक्षा मेहेत्रे यांनी ३०२ वा क्रमांक प्राप्त केला. दोघांनी ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतले. हिरडे हे प्रोबेशनल आयपीएस आहेत तर मेहेत्रे या सीए आहेत. तसेच कळव्यातील प्रशांत भोजने यांनी ८४९ वा क्रमांक प्राप्त केला.

यूपीएससीची तयारी २०२० पासून सुरू केली. पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर पुणे येथील बार्टीची परीक्षा दिली. ती अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर दिल्ली येथे प्रशिक्षणाची संधी मिळाली. तेथील पोषक वातावरणात खडतर परिश्रम घेऊन तिने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बार्टी संस्थेमुळेच मला माझे स्वप्न पूर्ण करता आले. - वृषाली कांबळे

इंजिनिअरिंग केल्यावर प्रशांतने यूपीएससीची परीक्षा दिली. प्रशांत सध्या दिल्लीत आहेत. पण, मुलाचे यश पाहून आनंद वाटतो. - रमेश भोजने, (प्रशांतचे वडील)

वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर  यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु, सलग सहा वेळा परीक्षा देऊन आणि तीनदा मुलाखतीपर्यंत पोहचूनसुद्धा त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी सीआरपीएफमध्ये सहायक कमांडंट म्हणून नोकरी पत्करली. त्याच दरम्यान सातव्यांदा यूपीएससीची  परीक्षा  देऊन मुलाखतीपर्यंत पोहचले. यात देशात ९४५वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. या सर्व प्रक्रियेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा मला बळ देणारी ठरली. - डॉ. स्नेहल वाघमारे

सप्टेंबर महिन्यात आयपीएस होऊन महाराष्ट्रात येणार होतो. पण मला दुपारी ही आनंदाची बातमी मिळाली. मी आयएएसकडे वळणार आहे. सीडी देशमुख या संस्थेत गेल्या वर्षी प्रतिरूप मुलाखत दिली होती. त्यांनी  केलेल्या मार्गदर्शनाचा मला फायदा झाला. - अनिकेत हिरडे

मी चौथ्यांदा परीक्षा दिली. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही. माझे पहिले प्राधान्य आयएएस आणि मग आयआरएसला आहे. या परीक्षेसाठी आत्मविश्वास आणि संयम हवा. अभ्यास मनापासून करावा. मी सीए असल्याने आर्थिक विषयांशी निगडित विषय वाचले होते. - समीक्षा मेहेत्रे 

टॅग्स :मुंबईकेंद्रीय लोकसेवा आयोग