Join us  

महालक्ष्मी रेल्वे कारखाना पहिला ‘शून्य भंगार कारखाना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 3:14 AM

मुंबई : महालक्ष्मी रेल्वे कारखाना भारतीय रेल्वेमधील पहिला ‘शून्य भंगार कारखाना’ ठरला आहे. रेल्वे बोर्डाकडून तशी घोषणा करण्यात आली ...

मुंबई : महालक्ष्मी रेल्वे कारखाना भारतीय रेल्वेमधील पहिला ‘शून्य भंगार कारखाना’ ठरला आहे. रेल्वे बोर्डाकडून तशी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाचे सदस्य साहित्य प्रबंधक व्ही. पी. पाठक आणि अतिरिक्त सदस्य ओ. पी. खरे यांनी रविवारी महालक्ष्मी कारखान्याचे संपूर्ण निरीक्षण केले. प्रत्येक साहित्य कशा प्रकारे उपयोगात आणले जाते, भंगाराची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते, हे निरीक्षणात आले. त्यामुळेच महालक्ष्मी कारखान्याला ‘शून्य भंगार कारखाना’ घोषित करण्यात आले.

२०१८-१९ या वर्षात महालक्ष्मी कारखान्यातील ४५०.०६६ मेगाटन धातूचे तुकडे आणि ७७ जुन्या लोकल भंगारात काढल्या. तर, १९ जुलै २०१९ पर्यंत १५० मेगाटन धातूचे तुकडे आणि १२ जुन्या लोकल भंगारात काढल्या. त्यामुळे महालक्ष्मी कारखान्यात आता शून्य भंगार शिल्लक राहल्याने ‘शून्य भंगार कारखाना’ असा पुरस्कार देण्यात आला. २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘श्रेय अधिकारी, कर्मचाऱ्यांना’पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेमधील महालक्ष्मी कारखान्याला हा किताब मिळणे ही खूप मोठी बाब आहे. सर्वप्रथम लोहयुक्त आणि इतर धातूच्या वस्तूंचे वर्गीकरण केले. याद्वारे या वस्तू भंगारात काढल्या. याचे श्रेय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला जाते. त्यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्या कुशल आणि ऊर्जावान नेतृत्वामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.

टॅग्स :रेल्वे