Join us

महाडच्या २५ वाड्या तहानलेल्या

By admin | Updated: May 15, 2015 23:06 IST

टँकरमुक्तीसाठी गावागावांमध्ये विविध शासकीय पाणीपुरवठा योजना राबवून देखील महाड तालुका टँकरमुक्त होण्याची चिन्हे अद्यापही

महाड : टँकरमुक्तीसाठी गावागावांमध्ये विविध शासकीय पाणीपुरवठा योजना राबवून देखील महाड तालुका टँकरमुक्त होण्याची चिन्हे अद्यापही अस्पष्टच आहेत. पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर या योजनेचा ठेका मिळवण्यासाठी राजकीय पक्षाचे पुढारी पुढे सरसावतात. मात्र दोन-तीन वर्षे होऊन देखील या योजना स्थानिक ग्रामस्थ, राजकीय वाद तसेच कामातील भ्रष्टाचार अशा अनेक अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारा उष्मा, पाण्याच्या पातळीत होणारी घट यामुळे महाड तालुक्यात पाणीटंचाई वाढत असून सद्यस्थितीत एक गाव २४ वाड्या अशा पंचवीस ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. महाड तालुक्यात पाचाड गाव, पाचाड नाका, रायगडचा पायथा, पाचाड बौद्धवाडी, मोहल्ला या ठिकाणी तर दरवर्षीच पाणीटंचाईच्या झळा पोहोचतात. रायगडमध्ये सध्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना मात्र पाणी नाही तर पर्यटकांना कुठले पाणी द्यायचे, असा सवाल पाचाड गावचे ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी केला आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र तो पुरेसा नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. (वार्ताहर)