Join us
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यावरील महादेवाचे मंदिर दुर्लक्षित

By admin | Updated: August 3, 2014 23:55 IST

श्रावणाला सुरूवात झाल्याने वातावरण एकंदरीतच आल्हाददायक असे बनले आहे. त्यामुळे परिसरही धार्मिक बनला आहे.

वसई : श्रावणाला सुरूवात झाल्याने वातावरण एकंदरीतच आल्हाददायक असे बनले आहे. त्यामुळे परिसरही धार्मिक बनला आहे. अशातच श्रावणी सोमवारची ख्याती काय वर्णावी? भक्तांचा हर हर महादेवचा जपही सुरू आहे आणि त्यानिमित्ताने मंदिरांत जाणेही सुरू आहे. मात्र जुन्या आणि प्रसिध्द शिवमंदिरांसह परिसरातील जुनी आणि तरीही नागरिकांपासून दूर असलेली शिवमंदिरेही आहेत. वसई किल्ल्यावरील प्राचीन शिवमंदिरांचा उल्लेख करायचा म्हटल्यास निसर्ग सौंदर्याचा थाट लेलेले आणि तरीही सर्वांपासून कोसो मैल दूर असलेले मंदिर असा त्याचा उल्लेख मिळेल.वसईचा किल्ला हा वसई तालुक्यातील भुईकोट किल्ला म्हणून प्रसिध्द आहे. हा किल्ला समुद्रकिनाऱ्याशी बांधलेला आहे. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर या किल्ल्याची बांधणी झाली असून तो पोर्तुगिजांनी बांधल्याचा उल्लेख सापडतो. १७३९ साली पोर्तुगिजांकडून हा किल्ला चिमाजी आप्पांनी सर केला त्यामुळे चिमाजी आप्पा यांचे भव्य स्मारकही किल्ल्यात प्रवेश केल्यावर दिसून येते. समुद्राचे वेष्टन असल्याने या किल्ल्याला एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. त्यामुळे नागरिक, पर्यटक येथे साहजिकच आकृष्ट होतात. अशा या किल्ल्यात चर्चेस, मंदिरेही आढळून येतात. विविध देवदेवतांच्या मंदिरांमुळे या ठिकाणाला धार्मिक पार्श्वभूमी असून चर्चच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावही राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या किल्ल्यात हनुमानाची दोन मंदिरे असून वज्रेश्वराचे देऊळही आहे. तसेच शंभो महादेवाचे नव्या धाटाचे मंदिर साऱ्यांचे लक्ष आकर्षून घेते. किल्ला बांधणीच्या काळात या मंदिराचीही निर्मिती झाली असली तरी त्यात आधुनिकता असल्याने हे मंदिर कमी कालावधीत प्रसिध्द पावलेले आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटक, भक्तगणही या मंदिराला आवर्जून भेट देतात. श्रावणी सोमवारनिमित्त येथे भक्तगणांची मांदियाळीच भरते.