Join us  

टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन बनविण्याच्या दृष्टीने मुंबईत उभारणार भव्य बॉलिवूड संग्रहालय- जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 3:41 PM

मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातील चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षण केंद्र आहे. हे लक्षात घेऊन याला टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन बनविण्याच्या दृष्टीने मुंबईत भव्य असे बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल.

मुंबई- मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातील चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षण केंद्र आहे. हे लक्षात घेऊन याला टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन बनविण्याच्या दृष्टीने मुंबईत भव्य असे बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल. यासाठी वांद्रे-जुहू परिसरात जागा मिळण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत आपण मागणी करू, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत सांगितले.  पर्यटन विषयाच्या अनुषंगाने नियम 293 अन्वये विधानसभेत सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेस काल रात्री उशिरा उत्तर देताना मंत्री रावल बोलत होते. चर्चेत विधानसभेतील अनेक सदस्यांनी सहभाग घेत महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या. मंत्री रावल यांनी या सर्व सूचना लक्षात घेऊन काल विधानसभेत सविस्तर उत्तर दिले. मंत्री रावल म्हणाले की, मंबईत असलेल्या बॉलिवूडला मोठा इतिहास आहे. हा इतिहास उजागर होण्याच्या दृष्टीने तसेच देश - विदेशातील पर्यटकांना मुंबईत आणखी एक टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत हे संग्रहालय उभारण्यात येईल. यात चित्रपटसृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या सुवर्णकाळापर्यंतचा सर्व कालावधी दर्शविण्यात येईल. अगदी सुरुवातीच्या अभिनेत्यांपासून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते आजपर्यंतच्या अभिनेते, अभिनेत्री, लता, रफी, किशोर यांच्यापासून चित्रपटसृष्टीला वैभवशाली बनविण्यात योगदान दिलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञांचा इतिहास या संग्रहालयात उजागर करू. जुन्या काळातील वेशभूषा, पोस्टर्स, चित्रीकरणाचे साहित्य, कलासेट, फोटोगॅलरी, कॅमेरे अशा सर्वांचा या संग्रहालयात समावेश करू. चित्रपटप्रेमी, अभ्यासकांना उपयोग होण्याबरोबरच पर्यटकांसाठीही विशेष आकर्षण ठरेल असे संग्रहालय निर्माण करू, असे ते म्हणाले.  राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण लवकरचमंत्री रावल पुढे म्हणाले की, राज्यातील पर्यटन व्यवसायवृद्धीसाठी राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय, भारतीय आणि राज्यातील पर्यटक अशी पर्यटकांची वर्गवारी राज्याने केली असून, सर्वसामान्य माणसानेही पर्यटन करावे, यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र ठरत आहे. युनेस्कोने घोषित केलेल्या ३७ जागतिक वारसास्थळांपैकी पाच वारसास्थळे आपल्या महाराष्ट्रात आहेत, ही आपल्या राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. याशिवाय राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्रपणे वारसास्थळे धोरण तयार करण्यात येत असून खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा या धोरण समितीत समावेश करण्यात आला आहे. तसेच पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी कंपन्यांना मुद्रांक शुल्क, जीएसटी आणि वीजदरात सूट दिली जाणार असून त्यांना सवलतीच्या दरात जमीन आणि मुंबईसारख्या शहरात एफएसआय देण्याचा प्रस्ताव धोरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. औरंगाबादसाठी स्वतंत्र पर्यटन विकास आराखडाऔरंगाबाद येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्रपणे औरंगाबाद पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्यासाठी ४४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही पर्यटन मंत्री रावल यांनी यावेळी दिली. सिंदखेडराजा या जिजाऊंच्या जन्मस्थानासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे तसेच जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका घोषित करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.देश-विदेशातील पर्यटनाचा अभ्यास व्हावा- आमदार सुनील प्रभूआमदार अमित साटम यांनी त्यांच्या चर्चेत मुंबईसाठी बॉलिवूड संग्रहालय आवश्यक असल्याचे सांगितले होते. हे संग्रहालय झाल्यास मुंबईच्या पर्यटन विकासास चालना मिळेल, असे ते म्हणाले. आमदार सुनील प्रभू यावेळी म्हणाले की, जगातील अनेक देश पर्यटनावर जगतात. त्या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर आधारित आहे. अशा देशांचा राज्यातील पर्यटन विभागाने अभ्यास केला पाहिजे. यासाठी पर्यटन मंत्र्यांसह पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी देश - विदेशात दौरे करून तेथील चांगल्या संकल्पना महाराष्ट्रात राबवायला हव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जगभरासाठी आकर्षण केंद्रे आहेत. जागतिक स्टँडर्ड लक्षात घेऊन त्यांचा विकास केल्यास राज्याला मोठा फायदा होईल, असेही ते म्हणाले.