पाली : श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सव २१ ते २४ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. यावेळी होणारी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, बल्लाळेश्वर देवस्थानच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणरायाचे दर्शन सर्वांना घेता यावे व लांब रांग लागून गैरसोय होवू नये म्हणून रांगामध्ये गणेशभक्तांना उभे राहण्यासाठी देवस्थानच्या मठीमध्ये, बाहेरच्या बाजूस व हायस्कूलच्या मैदानावर मंडपाची व्यवस्था केली आहे, तर आकर्षक कमानी आणि विद्युत रोषणाईची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. पाली शहरात दिवसेंदिवस उभ्या राहत असलेल्या इमारतींमुळे जागा कमी होत असल्याने गणेशभक्तांच्या वाहनांच्या पार्र्किंग संदर्भात तहसीलदार व्ही. के. रौंदाळ, पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे सरपंच अॅड. धनंजय धारप व विश्वस्त यांच्या संयुक्त सभेत चर्चा व प्रत्यक्षात जागेची पाहणी करण्यात आली.उत्सवाच्या काळात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून या वेळी १५ पोलीस, उपनिरीक्षक १५४, पोलीस हवालदार व राखीव फोर्स, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक पथक आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक असे दोन अधिकारी आहेत. (वार्ताहर)