Join us  

उद्या महाराष्ट्र बंद ही अफवा! मराठा क्रांती मोर्चा; गुन्हे दाखल करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:22 AM

मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे १० जानेवारीला कुठलाही बंद पुकारला नसल्याचे स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातर्फे १० जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे १० जानेवारीला कुठलाही बंद पुकारला नसल्याचे स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातर्फे १० जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.पोखरकर यांनी सांगितले की, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही. त्यामुळे समाजाने अफवांवर विश्वास ठेवू नये. १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात एका मराठा तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक अ‍ॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत. याच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून ‘महाराष्ट्र बंद’बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नसून असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही, असेही पोखरकर यांनी सांगितले आहे.मराठा समाजातील तरुणांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत मराठा-दलित वाद पेटवण्याचे कटकारस्थान सुरू आहे. तरी कोणीही या राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहनही संघटनेने केले आहे. शिवाय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा क्रांती मोर्चाचे नाव घेऊन कोणत्याही पक्ष संघटनेने दिशाभूल करू नये, अन्यथा अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आलेला आहे.फेसबुकवर पोस्ट, गुन्हा दाखलसोलापूरमध्ये विशाल प्रकाश सातपुते (२१) याने ‘१० जानेवारीला सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकल्याने त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला नोटीस बजावली.

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चामहाराष्ट्र