Join us

एमआयडीसी पोलीस ठाण्यात मद्यधुंद महिलेचा हंगामा

By admin | Updated: September 22, 2015 01:54 IST

काही महिन्यांपूर्वी अंधेरीच्या डी.एन. नगर पोलीस ठाण्यात दोन मॉडेल्सनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत महिला पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली होती.

मुंबई : काही महिन्यांपूर्वी अंधेरीच्या डी.एन. नगर पोलीस ठाण्यात दोन मॉडेल्सनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत महिला पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर आता अंधेरी पूर्वच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे दारू पीत एका महिलेने गुरुवारी पहाटे गोंधळ घातला. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.सुनीता यादव (२५) असे या अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री ती एका हॉटेलसमोर दारू पिऊन तमाशा करत होती. लालबागच्या एका पंचातारांकित हॉटेलमध्ये ती कार्यरत आहे; आणि अंधेरीच्या जे.बी. नगर परिसरात राहत असल्याचे समजते. ती तिच्या एका मित्रासोबत टॅक्सीने अंधेरीपर्यंत आली. रस्त्यात तिने दारू विकत घेतली. त्यानंतर अंधेरीत एका हॉटेलसमोर येणाऱ्या-जाणाऱ्यांना शिवीगाळ करणे, अश्लील भाषेत बोलणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पथकाने तिला पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी तिला नीट उभेही राहता येत नव्हते. ती पोलीस ठाण्यातही दारू पीत होती आणि पोलिसांना शिवीगाळदेखील करीत होती. ‘मी हरियाणाची आहे. माझे खूप मोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत. सकाळी बघाच तुमचे काय होतेय ते,’ अशा धमक्याही ती पोलिसांना देत होती. त्यानंतर काही वेळाने आपण अनाथ असल्याचे सांगून ती पोलिसांकडे गयावया करू लागली. हा सगळा प्रकार सकाळपर्यंत सुरू होता. या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम मांडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)