Join us  

रस्त्यावर ‘पार्क’ केलेल्या खाजगी बसगाड्या पालिकेच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:00 AM

अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी बसगाड्या लक्ष्य असणार आहेत.

ठळक मुद्देअनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी बसगाड्या लक्ष्य.बेस्ट उपक्रमाचे २४ बस आगार व ३७ बस स्थानकांच्या जागांवर कमी दरात वाहनतळ सुविधा उपलब्ध.अनेक खाजगी बसगाड्या रस्त्यांवर उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे.

मुंबई - अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी बसगाड्या लक्ष्य असणार आहेत. बेस्ट उपक्रमाचे २४ बस आगार व ३७ बस स्थानकांच्या जागांवर कमी दरात वाहनतळ सुविधा उपलब्ध आहे. तरीही अनेक खाजगी बसगाड्या रस्त्यांवर उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांकडून १ सप्टेंबर २०१९ पासून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच बसगाडी जप्त करून तिचा लिलाव केला जाईल, असा सज्जड इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

बस आगार आणि स्थानकांमध्ये साडेतीन हजार बसगाड्या उभ्या राहू शकतील. मात्र ही सुविधा कमी दरामध्ये उपलब्ध असतानाही आतापर्यंत ४१२ वेळाच या सुविधेचा लाभ घेण्यात आला आहे. अनेक खाजगी बस अजूनही रस्त्यांवर ‘पार्क’ केल्याचे पालिकेला आढळून आले आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूककोंडीत भर पडत असल्याने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई गणेशोत्सव काळापासूनच सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे.

मोठ्या बस गाड्यांवर पाच हजार रुपये टोचन शुल्क आणि १० हजार रुपये दंड असे किमान १५ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. तसेच ज्या बसगाडीवर एकदा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी बस पुन्हा अनधिकृतपणे पार्क केल्याचे आढळून आल्यास ती जप्त करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या या बसगाडीचा लिलाव करण्याचेही निर्देश आढावा बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत. या कारवाईतून शालेय बसगाड्यांना वगळण्यात आले आहे. या बैठकीला मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे प्रमुख रमानाथ झा, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२४ बस आगारांत जागा राखीव

- मुंबईतील २४ बस आगार व ३७ बस स्थानकांत तीन हजार ४९५ बसगाड्या पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. यासाठी माफक दर आकारला जात आहे.

- अनेक बसचालक वा मालक हे या सुविधेचा लाभ न घेता रस्त्यांवर बस पार्क करीत असल्याचे आढळून आले आहे.

- विशेष म्हणजे ही सुविधा सुरू करण्यात आल्यापासून आजवर केवळ ४१२ वेळा खाजगी बसगाड्या या बेस्टच्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या.

- दैनिक सरासरी केवळ २० गाड्या बस आगार आणि बस स्थानकांमध्ये उपलब्ध पार्किंगच्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या.

- याव्यतिरिक्त या ठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी केवळ ३७९ बसगाड्यांसाठी ‘मासिक पास’ काढण्यात आले आहेत. 

टॅग्स :मुंबईपार्किंग