Join us  

विद्याधर जोशी यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 10:28 AM

कोणत्याही कृत्रिम प्राणवायूची गरज नसून आता ते स्वतःहून श्वसन करत असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेते विद्याधर जोशी यांच्यावर गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणत्याही कृत्रिम प्राणवायूची गरज नसून आता ते स्वतःहून श्वसन करत असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.  

जोशी यांना गेल्या काही वर्षांपासून श्वसनाचा त्रास होत होता. २०२० मध्ये, त्यांना खोकला येण्यास सुरुवात झाली आणि श्वसनाचा त्रास अधिक बळावला. वैद्यकीय तपासणीत त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस  (फुप्फुसाचा गंभीर आजार) आजाराचे निदान झाले. त्यांच्यावर ऑक्सिजन थेरपी आणि इतर उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्रास थांबत नाही कळल्यावर फुप्फुस प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. 

 २०२२ मध्ये हे उपचार घेताना, त्यांना सुरुवातीला श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ लागला आणि त्याचवेळी त्यांना सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांना कृत्रिम प्राणवायूवर ठेवण्यात आले. जानेवारीमध्ये त्यांच्यावर  फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर १० दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आणि त्यावेळी कृत्रिम प्राणवायूचा आधार देखील काढण्यात आला. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत व त्यानंतरच्या उपचारात डॉ. उन्मील शाह, ट्रान्सप्लांट पल्मोनोलॉजिस्ट आणि डॉ. संदीप अट्टावर, फुप्फुस प्रत्यारोपण शल्यचिकित्सक यांचा सहभाग होता.

 

टॅग्स :विद्याधर जोशी