Join us

लोअर परेलची सफाई कामगारांची चौकी धोक्यात

By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST

लोअर परेलची सफाई कामगारांची चौकी धोक्यात

लोअर परेलची सफाई कामगारांची चौकी धोक्यात
प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा जागेवर डोळा

मुंबई : लेखी मंजुरीशिवाय तसेच पाणी, लाईट, लॉकर्स या सुविधांसह सिमेंटची पक्की चौकी जोवर सफाई कामगारांना मिळत नाही, तोवर कोणत्याही चौक्या हटवण्यात येऊ नयेत, असा अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा आदेश आहे. मात्र हे आदेश झुगारुन लोअर परेल येथील सफाई कामगारांची चौकी हटवण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सफाई कामगारांनी या सगळ्या प्रकाराला कडाडून विरोध दर्शवला आहे. या चौकीचे वीज, पाणी कनेक्शन देखील दडपशाही करुन तोडण्यात आले आहे.
लोअर परेल येथील सफाई कर्मचार्‍यांची हजेरी चौकी सध्या महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात खुपत असल्याचे चित्र आहे. या सफाई चौकीवर १०० ते १२५ कर्मचारी हजेरीसाठी येतात. अनेक गैरसोयी असूनही ही चौकी कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाची आहे. मात्र, असलेली जागाही बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप म्युनसिपल मजदूर युनियनने केला आहे.
एकीकडे स्वच्छता मोहिम जोरदार राबवली जात असतानाच स्वच्छता करणार्‍या कामगारांना रस्त्यावर आणण्याचा घाट प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घातल्याचे विदारक चित्र येथे दिसून आले आहे. लोअर परेल वर्कशॉपसमोर महापालिकेची प्रीफॅब्रिकेटेड हजेरी चौकी आहे. या चौकीमध्ये शंभराहून अधिक सफाई कर्मचारी दैनंदिन हजेरी लावण्यास येतात. या चौकीच्या अखत्यारित आसपासच्या परिसरातील साफसफाईची जबाबदारी आहे. येथे महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात असून त्यांना कपडे बदलण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही. हजेरी चौकीची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. या परिस्थितीत देखील सफाई कामगार जबाबदारी चोख बजावत आहेत. पाण्याचे व वीजेचे कनेक्शन तोडून लोकप्रतिनिधी मनमानी करत असल्याचा आरोप मजदूर युनियनने केला आहे. महापालिका प्रशासन या चौकीच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याचे सोडून सफाई कर्मचार्‍यांना रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही या कर्मचार्‍यांनी केला आहे. साफसफाई करणार्‍या कामगारांची ही अवस्था आहे तर सर्वसामान्य जनतेची काय असेल? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. या दडपशाहीमुळे साफसफाई कामगारांमध्ये तीव्र नाराजी असून कामगार आंदोनलाच्या पवित्र्यात आहेत. (प्रतिनिधी)