Join us  

लोअर परळ येथील पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 5:31 PM

लोअर परळ येथील जीर्ण पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला आहे. 

 मुंबई - लोअर परळ येथील जीर्ण पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला आहे.  लोअर परळ येथील पुलाचा आराखडा रेल्‍वे तयार करणार असून, जो भाग पालिकेच्‍या हद्दीत येतो त्‍याचे बांधकाम पालिका करेल तर रेल्‍वे हद्दीतील काम रेल्‍वे करेल, असे  रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांच्‍या उपस्थितीत ठरवण्यात आले.  मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वात भेटलेल्‍या शिष्‍टमंडळाला ही माहिती रेल्‍वे मंत्र्यांनी दिली.

लोअर परेल येथील धोकादायक पुल पाडण्‍याचे काम सुरू असून, हा पुल नेमका कुणी बांधावा याबाबत पालिका आणि रेल्‍वे मध्‍ये तू-तू मै- मै सुरू होती. हा पुल मुंबईकरांच्‍या दुष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाचा असल्‍यामुळे त्‍याच्‍या कामात कोणताही विलंब होऊ नये म्‍हणून मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी गेल्‍या आठवडयात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पुलाचे काम कालबध्‍द पध्‍दतीने करण्‍यात यावे अशी मागणी केली होती. तर आज मुंबई भेटीवर असलेल्‍या रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांची आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने भेट घेतली. हा पुल वाहतूकीच्‍या दुष्‍टीने महत्‍वाचा असल्‍यामुळे त्‍याचा निर्णय तातडीने व्‍हावा अशी विनंती त्‍यांनी पुन्‍हा रेल्‍वे मंत्र्यांना केली. या शिष्‍टमंडळामध्‍ये शिवडी मंडळ अध्‍यक्ष अरूण दळवी, जिल्‍हा सरचिटणीस सतिश तिवारी, राजन घाग, नितीन पवार, विश्‍वनाथ तोरसकर आणि अन्‍य लालबाग, परळ मधील पदधिका-यांचा समावेश होता.

या शिष्‍टमंडळाला रेल्‍वे मंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले की, आज झालेल्‍या संयुक्‍त बैठकीतनंतर या पुलाचा संपुर्ण आराखडा रेल्‍वे तयार करणार असून महापालिकेच्‍या हद्दितील पुलाचे काम महापालिका करणार असून रेल्‍वेच्‍या हद्दितील पुलाचे बांधकाम रेल्‍वे करणार आहे. त्‍यामुळे या पुलावरून तयार झालेला तिढा अखेर सुटला आहे.

टॅग्स :लोअर परेलमुंबई महानगरपालिकाभारतीय रेल्वे