Join us  

Lower Parel Bridge - यंत्रणा हतबल, लोअर परेलजवळ RPF जवान होणार तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 1:48 PM

धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

मुंबई : धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने पुलालगत असलेल्या चिंचोळ्या गल्लीतून नागरिकांनी वाट काढली. यामुळे सकाळी 'पिक अव्हर' मध्ये गर्दी, रेटारेटी आणि एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती स्थानिकामध्ये निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच लोअर परळ स्थानकावर सायंकाळी गर्दी नियोजनासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त जवान गर्दी नियोजनासाठी नियुक्त करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. 

सकाळी झालेल्या गर्दीनंतर स्थानिक उपायुक्ताच्या मदतीने रेल्वे हद्दीतील खात्रा येथून पादचाऱ्यांसाठी विशेष मार्ग खुला करण्यात आला आहे. पुलाखालील इस्टन बेकरीलगत असलेल्या रस्त्यावरून लोअर परळ एक आणि दोन क्रमांक फलाट आणि सलमान गल्ली येथून वरळीला जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलीस आणि रेल्वे पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी असल्याचे रेल्वेचे पश्चिम परिमंडळाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, महापालिकासह संबंधित यंत्रणेने पूल बंद करण्याआधी पादचाऱ्यांसाठी कोणत्या पर्यायी मार्गाची व्यवस्था केली होती? कोणत्याही पूर्वसूचनेविना का बंदी घालण्यात आली? महापालिकेने लावलेल्या फलकानुसार केवळ अवजड वाहनांसाठी ही बंदी होती, मग अचानक पादचाऱ्यांनाही का बंदी घालण्यात आली ? असे प्रश्न श्रीराम मिल परिसरातील राम देशमुख यांनी महापालिका यंत्रणेला विचारले आहेत.

दक्षिण मुंबईतील 'कॉर्पोरेट हब' अशी ओळख असलेल्या लोअर परळ परिसरात अनेक खासगी समूहाचे मुख्य कार्यालय आहेत. तर लोअर परळ येथून वरळी दिशेने जाणाऱ्या मार्गावर गणपतराव चाळ याठिकाणी मध्यमवर्गीयांचीही मोठी वस्ती आहे. पादचाऱ्यासाठी पूल बंद असल्याने पुलाखालील चिंचोळ्या भागात स्थानिकांच्या दुचाकीसह, टॅक्सी, लहान टेम्पो, हातगाडी अशी वाहने उभ्या असल्याने नागरिकांना प्रत्यक्ष रहदारी करण्यासाठी अतिशय कमी जागा उपलब्ध होती. त्यामुळे सकाळी गर्दीच्यावेळी एकच गोंधळ उडाला होता. गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये महापालिका यंत्रणेने गर्दी नियोजनासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नव्हती.

टोविंग व्हॅनचे काम सुरू

सकाळी उदभवलेल्या गर्दीच्या परिस्थितीनंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास पुलाखालील दुचाकी वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी टोविंग व्हॅन आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करत पादचाऱ्यांसाठी रस्ता मोकळा केला आहे.

 

टॅग्स :लोअर परेलमुंबईमुंबई लोकल