Join us

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बंगालच्या उपसागरात आणखी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याचा प्रभाव उत्तर पश्चिम उत्तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बंगालच्या उपसागरात आणखी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याचा प्रभाव उत्तर पश्चिम उत्तर दिशेला राहणार आहे. परिणामी, कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावरही राहणार आहे. टप्प्याटप्प्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर याचा प्रभाव राहील. एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले होते. मात्र, पावसाचा पत्ता नव्हता. दुपारी तर मुंबईत कडाक्याचे ऊन पडले होते.