Join us  

मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 6:19 AM

मुंबई : राज्यासह मुंबईत गुलाबी थंडी पडली असतानाच, सोमवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला.

मुंबई : राज्यासह मुंबईत गुलाबी थंडी पडली असतानाच, सोमवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह मुंबईत पाऊस पडल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून, सोमवारी सकाळी राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मुंबई आणि उपनगरात ठिकठिकाणी हवामान ढगाळ होते. हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून किमान तापमानातही वाढ नोंदविण्यात आली आहे.मुंबई शहरात फोर्ट, कुलाबा, मरिन ड्राइव्ह, भायखळा, लालबाग, गिरगाव, वरळी, दादर, माटुंगा, माहिम, सायन, कुर्ला, विद्याविहार, भांडुप, मुलुंडसह अंधेरी, गोरेगावसह लगतच्या परिसरात सोमवारी सकाळी पावसाची नोंद झाली. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस कमी-अधिक फरकाने ठिकठिकाणी सकाळी अकरा वाजेपर्यंत तुरळक हजेरी लावत होता. सकाळी अकरानंतर पाऊस थांबला असला, तरी मुंबई शहरासह उपनगरावर दाटून आलेले मळभ सायंकाळपर्यंत कायम होते. मंगळवारसह बुधवारीही मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.मुंबईचे किमान तापमान २१.४ अंश नोंदविण्यात आले२१ नोव्हेंबर : कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.२२ नोव्हेंबर : कोकण-गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.२३-२४ नोव्हेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.नवी मुुंबईत अवकाळीनवी मुंबई : पनवेल, उलवे, नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अवघ्या काही मिनिटांच्या या पावसाने हवेतील गारवा आणखीनच वाढला आहे.>रायगड जिल्ह्यामध्ये रिमझिमरायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल, खालापूर तालुक्यांत सोमवारी सकाळी पावसाची रिमझिम झाली. यामुळे शेतातील भाताचे भारे भिजून काही ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावली होती.>कल्याण तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्तसोमवारच्या पावसामुळे ठाणे शहर, कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. तर, ग्रामीण पट्ट्यात या पावसाने रब्बी पीक व भातपीक झोडणी, मळणीवर विरजण पडल्याने शेतकरी चिंंताग्रस्त झाले आहेत. कल्याण तालुक्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.

टॅग्स :पाऊसमुंबई