Join us

'वस्त्रहरण' फेम लवराज कांबळी यांचे निधन; काही दिवसांपासून सुरू होते उपचार

By संजय घावरे | Updated: March 26, 2024 18:30 IST

लवराज आणि अंकुश कांबळी या जुळ्या भावांच्या जोडीने रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत रसिकांचे मनोरंजन केले. या जोडीतील लवराज यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या सान्निध्यात राहून रंगभूमीवर आपला ठसा उमटवला.

मुंबई : 'वस्त्रहरण' या विक्रमी मालवणी नाटकाचे सुरुवातीच्या काळापासूनचे साक्षीदार असलेले अभिनेते लवराज कांबळी (६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मुलुंड येथील राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा आणि सून असा परिवार आहे. मुलुंड येथील स्मशानभूमीत दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रसाद कांबळीसह नाट्यसृष्टीतील काही मंडळी उपस्थित होती.

लवराज आणि अंकुश कांबळी या जुळ्या भावांच्या जोडीने रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत रसिकांचे मनोरंजन केले. या जोडीतील लवराज यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या सान्निध्यात राहून रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. 'वस्त्रहरण' या नाटकात त्यांनी साकारलेला गोप्या रसिकांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. मालवणमधील कांबळीवाडी नाट्य संस्थेपासून 'वस्त्रहरण'सोबत लवराज यांचा अभिनय प्रवास सुरू झाला. लवराज, दिलीप, अंकुश, अविनाश, मच्छिंद्र कांबळी यांचा ग्रुप होता. या ग्रुपने 'वस्त्रहरण' नाट्य स्पर्धेत सादर केले.

कामगार कल्याण केंद्राच्या नाट्य स्पर्धेत 'वस्त्रहरण'ने पहिला क्रमांक पटकावला आणि हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. लवराज यांनी या नाटकात २५०० प्रयोगांमध्ये गोप्या साकारला. याखेरीज त्यांनी 'पांडगो इलो बा इलो', 'केला तुका', 'घास रे रामा' अशा भद्रकाली प्रोडक्शनच्या बऱ्याच नाटकांमध्ये काम केले. याखेरीज 'वडाची साल पिंपळाक', 'चंपू खानावळीन', 'येवा कोकण आपलाच असा' आदी नाटकांची निर्मितीही केली. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या 'सेम टू सेम' या चित्रपटात लव-अंकुश या जुळ्या भावांनी काम केले. याखेरीज १९९७च्या काळात टिव्हीवर प्रसारित झालेल्या रजीत कपूर यांच्या बहुचर्चित 'ब्योमकेश बक्षी' या हेरगिरीवर आधारलेल्या मालिकेतही हि जोडी दिसली होती. 'गोंधळात गोंधळ' या चित्रपटात लवराज यांनी छोटीशी भूमिका साकारली होती.