Join us

प्रियकर आकाश सोनावणेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

By admin | Updated: May 28, 2014 01:42 IST

एकतर्फी प्रेम प्रकरणातून २० वर्षीय पूजा भालेराव या तरुणीचा खून केल्यानंतर स्वत:वरही चाकूचे वार करून आकाश सोनावणे या माथेफिरूने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे

उल्हासनगर : एकतर्फी प्रेम प्रकरणातून २० वर्षीय पूजा भालेराव या तरुणीचा खून केल्यानंतर स्वत:वरही चाकूचे वार करून आकाश सोनावणे या माथेफिरूने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आता विठ्ठलवाडी पोलिसांनी आकाशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील सुभाष टेकडी परिसरातील आम्रपाली नगरातील पूजा हिच्यावर वालधुनी कल्याणमधील आकाशचे एकतर्फी प्रेम होते. त्याच्या या प्रेमाची माहिती आकाशच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी पूजाला मागणी घातली होती. मात्र पूजा व तिच्या आई-वडिलांनंी ही मागणी फेटाळून तिचे लग्न १ जून रोजी दुसर्‍या तरुणाबरोबर ठरविले होते. घरात लग्नाची धामधूम सुरू असतानाच मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आकाश पुन्हा पूजाच्या घरी जाऊन तिला मागणी घालू लागला होता. तिने मागणी फेटाळताच, आकाशने माझी नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही. असे ओरडत पूजाचा गळा चिरून स्वत:वर चाकूने वार केले. या प्रकारात दोघांचाही मृत्यू झाला. वातावरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी परिसरात रात्री बंदोबस्त ठेवला आहे. पुजाच्या घरीच दोघांचेही मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खूनाबाबत तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. पूजा माझ्या शिवाय कोणाचीच होऊ शकत नाही, अशा आशयाची चिठ्ठी घटनास्थळी मिळाल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)