Join us

आईचे प्रेमपाश मुलांच्या जिवावर

By admin | Updated: February 4, 2015 01:06 IST

अल्पवयीन असतानाच तस्लीमाचा विवाह झाला आणि ऐन तारुण्यात नवऱ्याने सोडले... पदरात दोन लहान मुले, वडिलांकडे जावे तर त्यांचीही खायची भ्रांत...

अल्पवयीन असतानाच तस्लीमाचा विवाह झाला आणि ऐन तारुण्यात नवऱ्याने सोडले... पदरात दोन लहान मुले, वडिलांकडे जावे तर त्यांचीही खायची भ्रांत... अशा परिस्थितीत तस्लीमा खान हैदराबादेतून मुंबईत आली. मुंबईत तिची विवाहित बहीण राहत होती. तरुण तस्लीमासमोर अख्खं आयुष्य उभं आहे आणि दोन मुलांची जबाबदारी आहे, हे ओळखून बहिणीच्या नवऱ्याने तिचं दुसरं लग्न करण्याचं ठरवलं. तिच्यासाठी गोरेगावच्या भगतसिंग नगरात राहणाऱ्या ताहीर छोटेखान या तरुणाची निवडही केली. दोघांची ओळख करून दिली. आसऱ्यासाठी तस्लीमा ताहिरसोबत भगतसिंग नगरात भाड्याने घेतलेल्या झोपड्यात राहू लागली. आठएक महिने लोटले. तस्लीमाचा जीव ताहिरमध्ये अडकला. हा काळ स्वप्ने रंगवण्यात गेला. पण नियतीने अचानक विचित्र कलाटणी घेतली आणि तस्लीमा आगीतून फुफाट्यात पडली. तस्लीमाच्या पहिल्या पतीने तिचा जाच केला होता. पुढे कुरबुरी वाढल्या आणि त्याची परिणती त्यांच्या घटस्फोटात झाली. ताहिरच्या सहवासात मात्र तस्लीमाला त्या आघाताचा विसर पडत होता. आपण रीतसर निकाह करू या म्हणून ताहिरही तिच्यामागे लागला होता. काही दिवस सोबत काढल्यावर ताहिरला धड नोकरी नाही हे लक्षात आलं आणि तस्लीमा थोडी सावध झाली. ‘आधी नोकरी, धंदा कर... मग करू या लग्न’, असं ती त्याला समजावत होती.दुसरीकडे ताहिरने मनातली बोच बाहेर काढली. ‘मला तू हवीस, पण तुझ्या मुलांची जबाबदारी मी का म्हणून घेऊ?’ या ताहिरच्या सवालाने तस्लीमा अस्वस्थ झाली. स्वप्नांना पुन्हा तडा जातो की काय, असे तिला वाटू लागले. तिने त्याची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ताहिर ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने मुलांची जबाबदारी झटकली म्हणून तस्लीमानेही ‘मुलांसकट माझा स्वीकार कर, जमत नसेल तर लग्न विसर,’ या शब्दांत त्याला ठणकावले. यामुळे ताहिरचा जळफळाट सुरू झाला. तस्लीमाच्या मुलांचा तो तिरस्कार करू लागला. त्यांना ‘कबाब मे हड्डी’ म्हणू लागला. तस्लीमा कामाच्या शोधात घराबाहेर असताना ताहिर दोन्ही मुलांचा छळ करू लागला. त्यात चार वर्षांच्या अयानला तर तो बघून घेत नव्हता. गेल्या सहा महिन्यांत त्याने अनेकदा अयानला अमानुष मारहाण केली होती. पण ताहिरला सोडले तर जाणार कुठे हा विचार तिला रोखत होता. तस्लीमाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि घात झालाच.३१ जानेवारीला तस्लीमा नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा अयान ताहिरसोबत होते. दुपारी तस्लीमा घरी परतली तेव्हा ताहिर अयानला हातात घेऊन रुग्णालयात निघालेला दिसला. ‘काय झालेय, अयान उठत का नाही? त्याच्या चेहऱ्यावर व्रण कसले? रक्त कसे आलेय?’ असे अनेक प्रश्न तिने ताहिरला केले. तो मात्र गप्पच होता. ताहिरच्या मारहाणीत अयान बेशुद्ध पडल्याचे एव्हाना तिला कळून चुकले. रुग्णालयात डॉक्टरांनी अयानला मृत घोषित केले तेव्हा मात्र तस्लीमाला पश्चात्ताप झाला. तिने हंबरडा फोडला. अयानला जखमा झाल्याने ही बाब डॉक्टरांनी तत्काळ बांगूरनगर पोलिसांच्या कानावर घातली. एपीआय ए.बी. मोरे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच तस्लीमाने ताहिरवर आरोप केला. त्यावरून पोलीस पथकाने आधी ताहिरला ताब्यात घेतलं. पुढे तिचा सविस्तर जबाब, अयानचा शवविच्छेदन अहवाल यावरून हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. शवविच्छेदन अहवालात अयानच्या डोक्यात आणि शरीरांतर्गत जखमा आढळल्या. त्यातील बहुतांश जखमा आधीच्या मारहाणीतल्या होत्या. ताहिर अयानला वरचेवर मारहाण करत असल्याची जाणीव तस्लीमाला होती. तिने वेळीच योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित अयान आज तिच्यासोबत असता, असं पोलीस सांगतात.आपल्यावर संशय नको म्हणून अयानला रुग्णालयात नेण्याचे नाटक ताहिरने केले. सुदैवाने तो रुग्णालयातच पोलिसांच्या हाती लागला. कारण ताहिर गुजरातचा, इतकीच माहिती तस्लीमा आणि तिच्या नातेवाइकांना होती. तो जर पसार झाला असता तर त्याला अटक करणे पोलिसांसाठी आव्हान ठरले असते. परित्यक्ता महिलांचे पारख न करता अन्य पुरुषांच्या प्रेमपाशात गुंतणे त्यांच्या मुलांच्या जिवावर बेतू शकते. मुंबईत गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी हे अधोरेखित झालेय.१एकत्र काम करताना निर्माण झालेली जवळीक. त्यातच ती नवऱ्यापासून स्वतंत्र झालेली. ही संधी संदीप बेहरेने साधली. वरचेवर तिच्या घरी संदीपची ये-जा वाढली. तिच्यासोबत तिच्या चार वर्षांच्या मुलाचेही लाड संदीपने सुरू केले. अधूनमधून त्याला फिरायला घेऊन जाऊ लागला. त्याच्यासोबत आणि त्याच्या आईसोबत संदीपचं नवं नातं आकार घेत होतं. मात्र मधल्या काळात तिची अन्य एका तरुणासोबत निर्माण झालेली जवळीक संदीपला अस्वस्थ करून गेली. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. २२८ जानेवारीलाही असाच वाद झाला. तिनेही उडवाउडवीची उत्तरे दिली. मग मात्र हिला अद्दल घडवायचीच, असे मनोमन ठरवून संदीपने तिच्या मुलाला फिरवून आणण्याच्या बहाण्याने सोबत घेतले. संदीपने मुलाला बऱ्याच ठिकाणी फिरवले. मात्र परतताना त्याने जोगेश्वरी स्थानकात त्याला लोकलबाहेर फेकले. त्या अपघातात चार वर्षांच्या चिमुरड्याने उजवा हात गमावला. मुलगा लोकलखाली आल्याचे पाहून संदीपला पश्चात्ताप झाला. त्याने लोकल सोडून मुलाला रुग्णालयात दाखल केले आणि तिथून पसार झाला.३मुलाने रुग्णालयात पोहोचलेल्या आईला अंकलने मला ढकलले, असे सांगितले. तेव्हा मात्र तिला आपली चूक उमगली. तिने संदीपविरोधात कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी खारच्या घरी छापा घालून संदीपला गजाआड केले. या घटनेनंतर संदीपलाही पश्चात्ताप झालाय आणि त्याच्या प्रेयसीला. दोघांच्या नात्यांमधील गुंता चार वर्षांच्या चिमुरड्याला मात्र आयुष्यभराची शिक्षा देऊन गेला.