Join us

गिरणी कामगारांच्या चार हजार घरांची लॉटरी डिसेंबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 01:16 IST

३ हजार ३६४ घरे बॉम्बे डाईंग मिल कामगारांसाठी, तर ४८२ घरे श्रीनिवास मिलच्या गिरणी कामगारांसाठी

मुंबई : डिसेंबरमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गिरणी कामगारांसाठी चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. यामध्ये ३ हजार ३६४ घरे ही बॉम्बे डाईंग मिल कामगारांसाठी, तर ४८२ घरे ही श्रीनिवास मिलच्या गिरणी कामगारांसाठी असणार आहेत.गिरणी कामगारांच्या लॉटरीच्या घरांबाबत पात्रता निश्चिती संदर्भात उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीने या लॉटरीस हिरवा कंदील दाखविल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्याने दिली. गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढण्यासाठी उच्चाधिकार समितीने घातलेल्या काही अटींमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी म्हाडा प्रशासनाने समितीला केली होती. म्हाडा उपाध्यक्षांनी या दुरुस्तीस मंजुरी दिली तर आपली हरकत नसल्याचे समितीने कळविले होते. त्यानुसार म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी ही अट बदलण्यास हरकत नसल्याचे कळविले आहे. लॉटरी काढल्यानंतर म्हाडा अधिकारी गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करतील, असे मंडळाला कळविण्यात आल्याने लॉटरीतील प्रमुख अडचण दूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.गिरणी कामगारांच्या लॉटरीसाठी म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे (आयटी) सॉफ्टवेअर बदलाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे आयटी विभागाने म्हाडा प्रशासनाला कळविले आहे.

टॅग्स :म्हाडा