Join us  

बीडीडीतील २४३ घरांची लॉटरी येत्या पंधरा दिवसांत काढण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 1:29 AM

नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया म्हाडामार्फत सुरू करण्यात आली आहे.

मुंंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये रहिवाशांच्या कायदेशीर सुरक्षेसाठी म्हाडाकडून येत्या पंधरा दिवसांमध्ये आॅनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडीतील ज्या २४३ कुटुंबीयांनी पुनर्विकास प्रक्रियेसाठी तयारी दर्शवून जे संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत, त्यांचा या लॉटरीत समावेश करण्यात येईल. वांद्रे पूर्व येथील म्हाडा भवनामध्येच ही लॉटरी प्रक्रिया पार पडणार आहे.नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया म्हाडामार्फत सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ना.म.जोशी मार्ग येथील २४३ कुटुंबीयांनी प्रकल्पामध्ये सहभागी होण्यास संमतीही दिली आहे. या २४३ जणांची लॉटरी काढण्यात येणार असल्याने या कुटुंबीयांना मिळणारे घर नेमके कुठे असेल, कोणते असेल, ते कोणत्या मजल्यावर असेल, तसेच सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येतील, याची संपूर्ण खात्री पटविण्याचा मार्ग म्हाडाने खुला केला आहे.या पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये लॉटरीपर्यंत आणखी संख्या वाढेल, असेही म्हाडाने स्पष्ट केले. लॉटरीचा मुख्य उद्देश येथील रहिवाशांमध्ये प्रकल्प पूर्ण होण्याविषयी विश्वास निर्माण करण्याबाबतचा आहे. या अनुषंगाने लॉटरी जाहीर करून भविष्यातील पुनर्विकास प्रकल्पाची ग्वाही देण्याची तयारी सुरू आहे. यासह त्यांच्या घराच्या सर्व कायदेशीर बाबी ही पूर्ण करण्यात येतील, या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.प्रकल्पाला अडसर ठरणाऱ्यांवर कारवाईम्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून तयारीदेखील सुरू करण्यात आली असून, ही लॉटरी पूर्णपणे पारदर्शक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कायदेशीर बाबीसुद्धा म्हाडाकडून पूर्ण केल्या जाणार आहेत. रहिवाशांना कोणत्याच प्रकारची अडचण राहणार नाही, याची काळजी म्हाडा घेणार आहे. ना.म.जोशी चाळीतील बीडीडी चाळींच्या दहापैकी चार इमारतींच्या पाडकामाला सुरुवात करून प्रत्यक्ष कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, तसेच प्रकल्पाला अडसर ठरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे आता बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला खºया अर्थाने वेग येणार आहे.

टॅग्स :म्हाडा