Join us  

स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा; भांडुपमध्ये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 2:15 AM

प्रत्येकाकडून किमान दीड ते ७, ८ लाखांपर्यंतची रक्कम घेतली असून फसवणूक झालेल्या ७५ जणांनी एकत्र येऊन पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले आहे.

मुंबई : विविध बॅँका, वित्तीय संस्थांनी थकीत कर्जामुळे जप्त केलेले फ्लॅट्स बाजारभावापेक्षा कमी दरात देण्याच्या आमिषाने मुलुंड येथील एका खासगी कंपनीने शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी हाउसिंग अ‍ॅण्ड बॅँकिंग कॉर्पोरेशन या कंपनीचा संचालक रवींद्र त्रिवेदी (रा. वसई) व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे कार्यालय पंधरवड्यापासून बंद असून संचालक व कर्मचारी वर्ग फरारी झाल्याची शक्यता गुंतवणूकदारांनी वर्तविली आहे.

या कंपनीने गेल्या सुमारे वर्षापासून ऑनलाइन जाहिराती देऊन शेकडो सदस्यांची नोंदणी करून घेतली आहे. प्रत्येकाकडून किमान दीड ते ७, ८ लाखांपर्यंतची रक्कम घेतली असून फसवणूक झालेल्या ७५ जणांनी एकत्र येऊन पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, फसवणुकीची रक्कम दोन ते अडीच कोटींच्या वर असून अद्याप अनेक सदस्यांना या फसवणुकीबद्दल माहितीही नाही.

वर्षा नितीन केरकर (वय ४०, रा. जोगेश्वरी) यांच्या नावे फिर्याद घेण्यात आलेली असून इतरांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्रिवेदीसह कंपनीतील कर्मचारी अमित शाह, अमोल माने, अनिकेत बुलबुले, प्रशांत शिंदे, यश घागेल, संजय भागट आदींविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्वांचे मोबाइल फोन बंद आहेत.

तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप (प.) एलबीएस रोड येथील पन्नालाल कम्पाउंडमध्ये त्रिवेदी याने हाउसिंग अ‍ॅण्ड बॅँकिंग कॉर्पोरेशन नावाने कार्यालय सुरू करून महानगरात विविध ठिकाणी विक्रीसाठी स्वस्तात सदनिका उपलब्ध असल्याच्या आॅनलाइन जाहिराती दिल्या. त्यासाठी जाहिरातींमध्ये बॅँकांनी जप्त केलेल्या फ्लॅटचे पत्ते व त्यासाठी भरावी लागणारी रक्कम नमूद केली होती. त्यानुसार इच्छुकाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांना घटनास्थळी जाऊन फ्लॅटची खातरजमा करण्याची सूचना केली जायची. त्या ठिकाणी दरवाजावर बॅँकेचे सील पाहून खात्री झाल्यानंतर कंपनीकडून खरेदीबाबतचे सर्व रीतसर व्यवहार पूर्ण करून दिले जातील, त्यासाठी घराच्या किमतीपेक्षा केवळ ३ लाख रुपये अधिक भरण्यास सांगून दोन मुदतीमध्ये ही रक्कम धनादेशाद्वारे घेतली जात असे. एकदा रक्कम भरल्यानंतर ‘प्रोसेडिंग’चे काम सुरू असल्याचे सांगून पेपर तयार झाल्यानंतर कळविले जाईल, असे सांगण्यात येत असे. अशा प्रकारे अनेकांनी अडीच, तीन वर्षे पैसे भरूनही त्यांना केवळ खोटे आश्वासन दिले जात होते.

अखेर १२ मेपासून कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे आढळून आल्याने गुंतवणूकदारांना आढळले. त्रिवेदीसह इतरांचे मोबाइल बंद असल्याने त्यांना फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत १७ मे रोजी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावर ३० मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त, व्यापारी, कामगारांना गंडारवी त्रिवेद्री व त्याच्या सहकाºयांकडून फसवणूक झालेल्यामध्ये अनेक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आहेत. महानगरात हक्काचे घर होईल, या आशेने कंपनीकडे कमिशन व प्रोसेसिंग शुल्क म्हणून २ ते ३ लाख तर काहींनी ६ ते ७ लाख रुपये भरले आहेत. त्यांच्याशिवाय महिला, व्यापारी व कामगारांनीही कंपनीच्या कार्यालयात नोंदणी केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाची मागणीत्रिवेद्री व त्याच्या सहकाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे. अद्याप अनेक गुंतवणूकदारांनी त्याबाबत तक्रार दिली नसल्याने त्याचा नेमका तपशील स्पष्ट होत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात यावा, यासाठी शनिवारी फसवणूक झालेल्या गुुंतवणूकदारांनी गुन्हा अन्वेषण शाखेत जाऊन निवेदन दिले आहे.

टॅग्स :धोकेबाजीमुंबई