Join us
Daily Top 2Weekly Top 5

धुरक्यात हरवले देशाच्या आर्थिक राजधानीचे आरोग्य

By संतोष आंधळे | Updated: December 2, 2024 09:06 IST

थंड हवा आणि धुरक्यामुळे श्वसनविकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. अनेक शहरवासीयांना हिवाळा, थंड हवा बाधक ठरते.  

संतोष आंधळे विशेष प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात आल्हाददायक गारवा आहे. रात्री आणि पहाटे झोंबरी हवा तर दिवसा ऊन असूनही थंडावा असं सुखावणारं, हवंहवंसं वातावरण आहे. पण त्याचवेळी त्याला छेद देणारी धुरक्याची चादर हा खरा चिंतेचा विषय आहे. थंडीत धुकं पडणं हे नैसर्गिक, पण त्यात शहरातली सिमेंटमिश्रित धूळ आणि धूर मिसळला की धुरकं निर्माण होतं. याच घातक धुरक्याचं साम्राज्य मुंबईच्या आकाशात आहे. थंड हवा आणि धुरक्यामुळे श्वसनविकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. अनेक शहरवासीयांना हिवाळा, थंड हवा बाधक ठरते.  

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात. मुंबईसह आसपासच्या परिसरात लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत अनेकजण सर्दी-खोकल्याच्या त्रासाने हैराण आहेत. काही रुग्ण घरीच उपचार घेतात, तर काही नागरिकांना मात्र उपचारांसाठी डॉक्टरांकडे जावे लागते. काही नागरिकांना श्वसनविकारांचा इतका त्रास होत आहे की, त्यांच्या छातीमधून शिट्टीसारखा आवाज येत आहे आणि घुरघूरही वाढली आहे. श्वसनमार्गातील संसर्गामुळे त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  

हिवाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. सर्दी-खोकल्याचा आजार बळावून न्यूमोनिया होण्याची भीती असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.  धुरात सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड असू शकतात. ते इतर वायू प्रदूषक आणि धुकं यात मिसळून धुरकं तयार करतात. यामुळे नागरिकांना श्वसनमार्गाच्या वरच्या भागाला संसर्ग होत आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

देशातील विविध शहरांत वायू प्रदूषणाने थैमान घातले आहे. अशुद्ध हवा घेत नागरिक दिवस ढकलत आहेत. साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान ऋतूबदलानुसार थंडी पडण्यास सुरूवात झाली आहे. वर्षभर उकाड्याचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना काही दिवसांपासून थंड हवामानामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या शहराचे किमान तापमान १६ ते  १७ अंशावर आहे. अनेकांना पंखे आणि एसीची गरज भासत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

लहान मुलांना धोका काय?

अनेक मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झाली नसल्याने थंडीत लहान मुलांना थंडी-ताप, सर्दी-खोकला आदी संसर्गजन्य आजार होतात. काही मुलांना झालेला सर्दीचा आजार श्वसनविकाराला कारणीभूत ठरू शकतो. अशा अवस्थेत ताप येणे हे प्रमुख लक्षण असते. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास न्यूमोनिया होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे लहान मुलांना झालेला सर्दी-खोकला-ताप गांभीर्याने घेऊन त्यांना तत्काळ डॉक्टरांना दाखवणे आणि योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल?

  लहान मुलांना कोणतीही थंड पेये किंवा थंड पदार्थ खाण्यास देऊ नये.

  मुलांना पौष्टिक अन्न द्यावे, या दिवसात शक्यतो उबदार कपडे घालावेत.

  ताप, सर्दी-खोकला आदी लक्षणे असतील तर लहान मुलांना शाळेत पाठवू नये.

कोणते आजार बळावतात?

पूर्वीपासून श्वसनव्याधी असलेल्यांना हिवाळ्यात अधिक त्रास होतो. दमा किंवा अस्थमा बळावणे, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी, थकवा जाणवणे, श्वसनमार्गातील अडथळ्यांमुळे किंवा संसर्गामुळे श्वास घेताना त्रास होणे, गुदमरल्यासारखे वाटणे, ताप येणे अशी लक्षणेही आढळतात. सर्वसाधारण नागरिकांनाही हिवाळा बाधक ठरू शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

थंडीच्या काळात लहान मुलांना श्वसनविकाराशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. या काळात त्यांना आजाराची काही लक्षणे दिसल्यास तत्काळ त्यावर उपचार घेतले पाहिजेत. अन्यथा गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. न्यूमोनिया होऊ शकतो. लहान मुलांना झालेल्या सर्दी-खोकल्यावर वेळीच योग्य उपचार घेतले तर न्यूमोनिया होण्याचा धोका टाळता येतो.