Join us

ब्रेकफास्टसाठी गमावले ७४ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST

पवईतील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रेकफास्टसाठी पवईतील ४५ वर्षीय व्यक्तीवर ७४ हजार रुपये गमाविण्याची वेळ आली आहे. ...

पवईतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ब्रेकफास्टसाठी पवईतील ४५ वर्षीय व्यक्तीवर ७४ हजार रुपये गमाविण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवीत तपास सुरू केला आहे.

गोरेगाव परिसरात राहणारे तक्रारदार एका मोबाइल कंपनीत नोकरी करतात. ते एकटेच राहतात. २७ जून रोजी ब्रेकफास्टसाठी गुगलवरून जवळच्या कॅफेचा क्रमांक मिळवीत फोनवर ऑर्डर दिली. फोनवर ऑर्डर घेणाऱ्या व्यक्तीने ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. सुरुवातीला तक्रारदारांनी नकार दिला. तेव्हा ऑर्डर रद्द करण्यास सांगताच, त्यांनी होकार दिला. यावेळी ठगाने त्यांना एक लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितले तसेच एक ॲप डाऊनलोड करायला लावले. हे सगळे करताना फाेनवर बोलत असतानाच त्यांना मोबाईलवर ओटीपी येण्यास सुरुवात झाली.

फोन ठेवल्यानंतर खात्यातून एकूण ७४ हजार २२३ रुपये वजा झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधताच समोरून फोन उचलला गेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली.