Join us

ओएलएक्सवर पत्नीचा गाउन विकण्याच्या नादात गमावले १० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:59 IST

जोगेश्वरी परिसरात ३७ वर्षीय तक्रारदार हे पत्नीसोबत राहतात. ते खासगी कंपनीत नोकरीला आहेत

मुंबई : ओएलएक्सवर खरेदी-विक्रीच्या बहाण्याने फसवणूक होत असल्याच्या घटना अनेकदा घडतात. अशाच प्रकारे ओएलएक्सवर १०० रुपयांत पत्नीचा गाऊन विकणे जोगेश्वरीतील ३७ वर्षीय इसमाला महागात पडले. या मोहात, त्यांच्यावर १० हजार रुपये गमाविण्याची वेळ आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

जोगेश्वरी परिसरात ३७ वर्षीय तक्रारदार हे पत्नीसोबत राहतात. ते खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी पत्नीसाठी गाऊन खरेदी केला होता. मात्र तिला तो पसंत न पडल्याने त्यांनी तो ओएलएक्सवर १०० रुपयांत विक्रीसाठी ठेवला. एका ठगाने त्यांच्याशी संपर्क साधला. गाऊन खरेदी करण्याची तयारी दाखवली. त्यांनी ठगाला फोन पे अ‍ॅपवरून पैसे पाठविण्यास सांगितले. त्याने पैसे पाठविल्याचा बनाव केला. मात्र पैसे न आल्याचे तक्रारदाराने सांगताच, त्यांच्याकडून पैसे पाठविण्याच्या नावाखाली खात्यासंबंधित माहिती घेतली. फोन पेद्वारे त्यांच्याच खात्यातून १० हजार काढले.

पैसे काढल्याचा संदेश मोबाइलवर धडकताच त्यांना धक्का बसला. त्यांनी, ठगाने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद होता. अनेकदा फोन करूनही काहीही संपर्क होत नसल्याने अखेर यात फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सोमवारी जोगेश्वरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जोगेश्वरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मोबाइल क्रमांकाच्या आधारे पोलीस ठगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :धोकेबाजी