Join us

‘स्वच्छ भारत’ला अधिका-यांचा खो

By admin | Updated: April 20, 2015 22:52 IST

स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत तलासरी तालुक्यात वैयक्तीक शौचालय योजना राबविण्यात येत असून यात शौचालय बांधून पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला

तलासरी : स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत तलासरी तालुक्यात वैयक्तीक शौचालय योजना राबविण्यात येत असून यात शौचालय बांधून पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला बारा हजार रू. अनुदान देण्यात येते. अनुदान मिळत असल्याने मोठ्या संख्येने तलासरी तालुक्यातील लाभार्थी वैयक्तीक शौचालये बांधू लागले. परंतु निधी उशीर मिळत असल्याने ही बांधकामे रखडू लागली आहेत. यात अधिकारीही गांभीर्याने काम करीत नसल्याने स्वच्छ भारत मिशन अभियानाला खीळ बसली आहे.तलासरी तालुक्याला २०१४-१५ सालाकरीता शौचालयाचा ४९२६ लक्षांक देण्यात आला. बारा हजाराचे अनुदान मिळत असल्याने ३१ मार्च २०१५ अखेर ३०३४ शौचालये बांधून लाभार्थ्यांनी पूर्ण केली. या पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त ४५५ लोकांना निधीचे वाटप करण्यात आले. तसेच प्रस्ताव असलेले ६११लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे. लाभार्थ्यांना अनुदान वाटपासाठी ४ कोटीची गरज असून ३२.२० लाख अनुदान अपुरे आले त्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थी अजून प्रतिक्षेत आहेत.तलासरी तालुक्याला ४ कोटी अनुदानाची गरज असताना सध्या एक दोन दिवसात १ कोटी अनुदान येण्याची शक्यता गटविकास अधिकाऱ्यांनी वर्तविली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या संख्येने लाभार्थी वैयक्तीक शौचालये कडे वळला असतांना जाणीव पूर्वक अनुदान कमी देऊन या स्वच्छ भारत मिशन अभियानाला वरिष्ठ अधिकारीच खो घालीत आहेत. नवीन पालघर जिल्हा अस्तित्वात आल्याने या जिल्ह्याला मोठा निधी येत असताना स्वच्छ भारत मिशन अभियानाला पालघर जिल्ह्याला फक्त ८ कोटीचा निधी आल्याने पालघर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अभियानाला खीळ बसू शकते. (वार्ताहर)