Join us  

मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीच्या नावे होतेय लूट?; ४,५०० रुपये शुल्क आकारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 7:37 AM

विमान कंपन्यांकडूनही होतेय सक्ती

मुंबई : कोरोनाचा शिरकाव होऊन दीड वर्ष लोटले तरी अद्याप त्याच्या नावे होणारी लूट थांबलेली नाही. मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीसाठी तब्बल ४ हजार ५०० रुपये आकारले जात असून, ही अतिरिक्त वसुली कधी थांबणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांना कोरोना चाचणीतून सूट देण्यात आली आहे. बऱ्याच देशांनी भारतीय प्रवाशांना अद्याप या बंधनातून मुक्त केले नसल्याने अहवालसक्ती कायम आहे. बहुतांशी त्याची मुदत ७२ तास इतकी आहे. विमानतळावर आल्यानंतर चाचणी केलेली नसल्यास दुबई, अबुधाबीसह लगतच्या देशांत जाणाऱ्या काही विमान कंपन्या प्रवाशांना विमानात चढण्याची परवानगी देत नाहीत.  नाइलाजास्तव ४ हजार ५०० रुपये मोजून चाचणी करावी लागत असल्याचे विमानतळावरील सूत्रांनी सांगितले. 

खासगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर चाचणी केल्यास ६०० रुपये आणि अँटिजनसाठी २५० ते ३०० रुपये घेतले जातात. तर रेल्वे-बसस्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी मोफत चाचण्या केल्या जातात. असे असताना हवाई प्रवाशांकडून ही अतिरिक्त शुल्क वसुली का केली जात आहे, असा सवाल काही प्रवाशांनी ‘’लोकमत’’शी बोलताना उपस्थित केला.

विमानतळ प्रशासन म्हणते....

सबर्बन डायग्नोस्टिक्स, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि. आणि लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड या तीन प्रयोगशाळांना मुंबई विमानतळावर चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती आणि शुल्क आकारणीबाबत धोरणनिश्चिती शासनाने केलेली आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मुंबई विमानतळ प्रशासनाला नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई विमानतळाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.

होतेय काय?

विमानतळावर चाचण्यांसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. ६०० रुपयांचा पर्याय स्वीकारल्यास ८ ते २२ तासांत अहवाल प्राप्त होतो. तत्काळ अहवाल हवा असल्यास ४ हजार ५०० रुपये मोजावे लागतात. विमानतळावर चाचणी केल्याशिवाय काही कंपन्या प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारत आहेत. विमान सुटण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना ही बाब कळल्यानंतर प्रवाशांसमोर अन्य पर्याय उरत नाही.एकतर ३० ते ३५ हजार रुपयांच्या तिकिटावर पाणी सोडायचे किंवा ४ हजार ५०० रुपये देऊन जलद चाचणी करायची, असे दोनच मार्ग उरतात.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमानतळ